दहा दिवसांत ४ गुन्हे दाखल, वाळूमाफिया पसार

वसई: विरारमधील खाडीतून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपाशाविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. मांडवी पोलिसांनी दहा दिवसात ४ मोठय़ा कारवाया करून वाळूमाफियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. वसई पूर्वेच्या खाडय़ांमधून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाळू उपसा होत असतो. ही वाळू चोरटय़ा मार्गाने मुंबईला नेली जाते. या वाळू उपशामुळे किनारे नष्ट होत असून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. नव्याने तयार होत असेलल्या मांडवी पोलिसांनी या बेकायेदशीर वाळू उपशाविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. नवीन वर्षांच्या सुरवातीपासूनच पोलिसांनी कारवाया करण्यास सुरवात केली आहे. पहिल्या १० दिवसात पोलिसांनी एकूण ४ मोठय़ा कारवाया केल्या आहेत. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून वाळूमाफिया पसार झाले आहेत.

या परिसरात कुठल्या प्रकारची बेकादेशीर वाळू उपसा आणि वाळूची वाहतूक चालू देणार नाही. सातत्याने कारवाया सुरूच राहतील, अशी माहिती प्रस्तावित मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रुफल्ल वाघ यांनी दिली. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी खाडी किनार्यावर २४ तास गस्त सुरू ठेवली असून पोलीस तैनात करण्यात आले आहे. याशिवाय खाडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. महामार्गावरून चोरटी रेतीची वाहतूक होत असल्याने महामार्गावरील गस्ती आणि नाकाबंदी वाढविण्यात असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

महसूल विभागाचे सहकार्य नाही

नवीन नियमाप्रमाणे वाळू जप्त करण्यात येत नसल्याने ती पुन्हा खाडीत टाकावी लागते. पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली वाळू पुन्हा खाडीत टाकण्यासाठी तसेच बोटी जप्त करण्यासाठी महसूल विभागाची गरज लागते. मात्र कारवाई करून ४ दिवस उलटूनही महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार आले नसल्याची तक्रार पोलिसांनी केली. आम्ही तहसीलदारांना ४ वेळा स्मरणपत्रे दिली होती. परंतु ४ दिवसांनी त्या आल्या. पुढील कारवाई झाली असे वाघ यांनी सांगितले. महसूल विभागाने सहाकार्य केल्यास वाळूमाफियांचे साम्राज्य नेस्तनाबूत करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.