केवळ ७३१ गुन्ह्यंचा शोध, विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड भागांत अधिक घटना
कल्पेश भोईर
वसई: रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकातही विविध प्रकारचे गुन्हे घडतात. मागील तीन वर्षांंत वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ हजार १५ विविध प्रकारचे गुन्हे घडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील केवळ ७३१ गुन्ह्यंचा शोध लागला आहे, तर अजूनही २ हजार २८४ गुन्ह्यंचा शोध सुरू आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यात विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत.याच गर्दीत मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी, महिला अत्याचाराच्या घटना यासह इतर छोटे- मोठे गुन्हे घडत असतात. यात काही भुरटय़ा चोरांच्या टोळ्या ही सक्रिय आहेत.
रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल खाली पाडून पळ काढणे असे प्रकार समोर येत असतात. रेल्वेत व रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक गुन्ह्यांचे प्रकार घडत असतात. या गुन्ह्यंचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांच्या समोरील मोठे आव्हान आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू असते. सन २०१९ मध्ये २०२६ गुन्हे घडले होते. त्यापैकी ४२९ गुन्ह्यंचा शोध लागला आहे. तर सन २०२० मध्ये ५५४ गुन्हे त्यापैकी १६१ गुन्ह्यंचा शोध व २०२१ मध्ये ४३५ गुन्हे १४१ गुन्ह्यांचा शोध लागला आहे. तीन वर्षांत अशा एकूण ३ हजार १५ गुन्ह्यांची नोंद रेल्वे पोलिसांत दाखल झाली असून त्यापैकी ७३१ गुन्हे उघड झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
प्रवाशांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन
रेल्वे स्थानकात विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात. मात्र अनेकदा प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना बेफिकीरपणे वावरतात त्याचा फटका ही प्रवाशांना बसतो. त्यामुळे रेल्वे गाडय़ातून प्रवास करताना सोबत असलेल्या मोबाइल, मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. काही वेळा प्रवासी गाडय़ात झोपून राहतात. याचाही फायदा घेत चोरीचे प्रकार घडतात त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांनी सतर्क व सावध राहून प्रवास करणे गरजेचे आहे असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.