वसई: टॅंकर चालकांचा बेदरकारपणा व निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात वीस दिवसांत वसई विरारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर घालण्यासाठी पुन्हा एकदा विरार वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पहिल्याच दिवशी ८ टॅंकरवर कारवाई करण्यात आली आहे.
वसई विरार शहरात टॅंकर चालक हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवितात. त्यामुळे अधूनमधून टॅंकर अपघाताच्या घटना समोर येत आहे. याआधी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी टॅंकर चालक मालक यांच्या बैठका घेतल्या होत्या तर वारंवार सूचनाही केल्या होत्या. मात्र अवघे काही दिवस नियमांचे पालन होते. मात्र त्यानंतर पुन्हा नियम धाब्यावर बसवून टॅंकर चालकांचा बेदरकारपणा सुरूच आहे. सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने वसई विरार भागात टॅंकरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नादुरुस्त, कालबाह्य, जुनाट अशी टॅंकरही रस्त्यावर धावू लागली आहेत.
हेही वाचा – मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
२ एप्रिलला विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टॅंकरने चिरडले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर १९ एप्रिलला विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये टॅंकर मागे वळण घेताना आजी आणि नातू या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वीस दिवसांतच ३ जणांचा टॅंकर अपघातात मृत्यू झाल्याने या प्रकराला रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून टॅंकर तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. ज्या भागात टॅंकरद्वारे पाण्याची वाहतूक अधिक होत आहे अशा ठिकाणी टॅंकर थांबवून टॅंकरचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना असलेला वाहनचालक, बॅच, क्लीनर, पाणी गळती, रिफ्लेक्टर अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात आहेत. पहिल्याच दिवशी विरार वाहतूक पोलिसांनी ८ टॅंकरवर कारवाई केली आहे. तर जानेवारीपासून ते आतापर्यंत १०५ टॅंकरवर कारवाई करून सुमारे १ लाख ३५ हजार इतका दंड आकारला आहे असे विरार वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले आहे. याशिवाय टॅंकर चालक व मालक यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना करण्यात येणार आहेत असेही लांगी यांनी सांगितले आहे.
क्लीनर नसल्याने अपघात दुर्घटना
टॅंकरमधून पाण्याची वाहतूक करताना टॅंकर चालकाच्या सोबत क्लीनर असणे आवश्यक आहे. क्लीनरमुळे मागे वळण घेताना आजूबाजूला कोणी आहे किंवा नाही. याशिवाय गर्दीच्या मार्गातून प्रवेश करताना कोणी टॅंकर जवळ आहे किंवा नाही याची माहिती चालकाला मिळण्यास मदत होते. मात्र वसई विरारमधील अनेक टॅंकरचालक विना क्लीनर टॅंकर चालवत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आता ज्या दोन्ही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात सोबत क्लीनर नसल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा – वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
परिवहन विभागही कारवाई करणार
वाढत्या टँकर अपघाताच्या घटना लक्षात घेता आता वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडूनही कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. याबाबत टँकर चालक व मालक यांच्या बैठका याशिवाय जे टॅंकर रस्त्यावर धावत आहेत त्यांची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. जे कालबाह्य टॅंकर आहेत तेसुद्धा जप्त करण्यात येतील असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले आहे.
टॅंकरची कारवाई मोहीम अधिक तीव्रपणे सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना त्यांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई होत आहे. – प्रशांत लांगी, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ ३