लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : न्यू इंडिया को- ऑपरेटीव्ह बँक बंद झाल्याने ग्राहक हवालदील झाले आहेत. शुक्रवार सकाळी बँक बंद झाल्याचे समजताच सकाळपासूनच ग्राहकांनी बँकेच्या वसई आणि विरार शाखेच्या बाहेर गर्दी केली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी बँकेबाहेर बंदोबस्त ठेवला होता. आपले पैसे नक्की मिळतील का? याची चिंता ग्राहकांना सतावत होती. संतप्त महिलांनी तर बॅंकेत्या कर्मचाऱ्यांवर आपला राग काढला.
गुरूवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध आणले. यामुळे बँक ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वसईच्या पारनाका आणि विरारच्या विराट नगर येथे बँकेच्या शाखा आहेत. हे समजताच शेकडो ग्राहकांनी बँकेच्या बाहेर एकच गर्दी केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही शाखांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला. बँकेच्या कर्मचार्यांना ग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले.