वसई : ‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.विरारमध्ये राहणारे फिर्यादी हे ४३ वर्षांचे असून, व्यवसायाने डॉक्टर आहेत. जानेवारीमध्ये ‘टेलिग्राम’वर त्यांची ओळख हाफिजा आर्या नावाच्या महिलेशी झाली. विविध सिनेमांना रेटिंग दिल्यास घरबसल्या पैसे मिळतील, असे तिने त्यांना सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ‘टेलिग्राम’वर सिनेमांना रेटिंग दिले. सुरुवातील फिर्यादी यांचा विश्वास बसावा यासाठी त्यांना काही पैसे देण्यात आले. त्यानंतर मात्र कमिशनची रक्कम जास्त आहे, तसेच प्राप्तिकर खात्याची धमकी देत वेगवेगळय़ा बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत फिर्यादी डॉक्टरने एक कोटी सात लाख ९० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी त्यांनी सायबर गुन्हे शाखा आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा सुरुवातीला विश्वास संपादन करून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले. ज्या खात्यात रक्कम भरली आहे, ती खाती आम्ही गोठवली आहेत, परंतु त्यात काही रक्कम नव्हती, असे या प्रकरणाचा तपास करणारे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी सांगितले.