लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : आयबी अधिकारी असल्याचे भासवून वसईतील एका आयटी तज्ञाला सायबर भामट्यानी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून तब्बल १ कोटी ४१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल पराडकर (५२) आयटी तज्ञ असून हे मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. १२ ऑगस्ट रोजी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. बंगळूर येथील आयबी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ५०० कोटींच्या घोटाळ्यात तुमचे नाव आले असून त्याची चौकशी करत असल्याचे या पोलिसांनी सांगितले. यानंतर फिर्यादी पराडकर यांना स्काईपवरून व्हिडियो कॉल केला. समोर आयबीचे पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात बसले होते. फिर्यादी यांना ते खरे वाटले.

आणखी वाचा-मिरा भाईदर महापालिका शाळेतील सुरक्षा रक्षकांनाही ‘मर्यादा; बदलापूर येथील घटनेनंतर खबरदारी

पुढील तपास तुमच्या सर्व आर्थिक व्यवहार आणि तुमच्यावर लक्ष असून तुम्हाला तांत्रिकदृष्टया कैद अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे या पोलिसांनी सांगितले. या सगळ्यावर फिर्यादींचा विश्वास बसला आणि त्यांच्या जाळ्यात सापडले. यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी त्वरीत बँक खात्यातून ७० लाख रुपये या भामट्यांना पाठवले. त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले ४० लाख आणि ठेवींमध्ये असलेले पैसे असे एकूण १ कोटी ४१ लाख रुपये भामट्यांना पाठवले. हा सर्व व्यवहार अवघ्या १९ दिवसात घडला. यानंतरही भामट्यांनी पैशांची मागणी सुरू ठेवली होती. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला आणि त्यांनी वसई पोलीस ठाणे गाठले.

वसई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४)३(५) अन्वये ३ भामट्यांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टची भीती घातली. व्हिडियो कॉल करून नकली पोलीस ठाणे दाखवले. त्याला घाबरून फिर्यादीने पैसे भामटयांना दिले. डिजिटल अरेस्ट हा सायबर भामट्यांचा फसवणुकीचा नवीन प्रकार असून त्याला कुणी फसू नये आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी केले.

आणखी वाचा-वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

काय आहे डिजिटल अरेस्ट?

डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवीन प्रकार आहे. यामध्ये भामटे स्काईपवरून व्हिडियो कॉल करतात. समोर नकली पोलीस ठाणी दाखवतात. कुठल्यातरी घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे भासवतात आणि डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगतात. म्हणजे परराज्यात पोलीस ठाणे असल्याने तुमच्या खात्यांवर, व्यहारांवर नजर असून चौकशी असल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. जे लोकं या भूलथापांना घाबरतात त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber theft robbed an it expert in vasai for worth rs 1 5 crore by digital arrest mrj