वसई : करोनाच्या निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी वसई, विरार शहरात मोठय़ा जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार मध्ये एकूण १ हजार ५७३ दहीहंडयांचे आयोजन करण्यात आले होते. ६०० हून अधिक गोविंदा पथकांनी यावर्षी सहभाग नोंदविला होता. उत्सव जल्लोषात साजरा झाला असला तरी गोविंदांनी पिपाण्या वाजवून केलेल्या उन्मादाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
मागील दोन वर्षांपासून करोना वैश्विक महामारीने दहीहंडी सणावर शासनाकडून बंदी घातली होती. मात्र या वर्षी करोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवून जल्लोषात उत्सव साजरे करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. यामुळे गोविदा पथकांत मोठा उत्साह निर्माण झाला होता. शहरभर सणाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक नवी मंडळे आणि गोविंदा पथके यावर्षी पाहायला मिळाली. यात महिला गोविंदा पथकांचा समावेशही अधिक होता.
वसई, विरार शहरात सकाळपासूनच गावागावात दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली होती. दहीहंडी फोडण्यासाठी तयार झालेल्या श्री कृष्णाला खांद्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मुख्य रस्ते, गल्लोगल्ली दहीहंडय़ा बांधल्या होत्या. या फोडण्यासाठी पथकांची चढाओढ सुरू होती. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लहान मुले, महिला वर्ग, नागरिकांनी गर्दी केली होती.
यावेळी एकावर एक असे मानवी मनोरे रचले जात होते. नागरिकांनी उत्सुकता आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या घोषणा, ढोलताशांचा ताल, ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम, घरात नाही पाणी’ अशा विविध गाण्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. घराच्या गॅलरीतून उत्साहाने होणारा पाण्याचा मारा सुरू होता, तसेच विविध प्रकारची वेशभूषा करून बाळ गोपाळ यात सामील झाले होते.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव साजरा होणार असल्याने या सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैणात करण्यात आले होते. यात परिमंडळ २ मध्ये ७६ अधिकारी, १९८ अंमलदार, ४० गृहरक्षक, ३० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात होते. तर परिमंडळ ३ मध्ये ४८ अधिकारी, १४२ अंमलदार, ५७ होमगार्ड, २४ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दहीहंडय़ांत २५ टक्क्यांनी वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत दहीहांडय़ांचे प्रमाणही २५ टक्क्यांनी वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. यात खासगी दहीहंडय़ांची संख्या अधिक आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीरा -भाईंदर आणि वसई, विरार शहरात २४४ सार्वजनिक तर १ हजार ३२९ खासगी दहीहंडय़ा उभारण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मंडळात गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी रोख पारितोषिकांसह इतरही काही पारितोषिके ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी करोनाकाळात काम केलेल्या करोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. वसई विरारमधील सार्वजनिक मंडळांनी १ लाखांपूसन ३ लाखांपर्यंतच्या रोख रकमेची पारितोषिके लावली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार परिमंडळ १ मीरा-भाईंदरमध्ये ८७ सार्वजनिक, १८३ खासगी दहीहंडी उभारण्यात आल्या. परिमंडळ २ मध्ये ६० सार्वजनिक, २६३ खासगी तर परिमंडळ ३ मध्ये १०६ सार्वजनिक, ८४३ खासगी दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या सर्वाधिक विरारमध्ये मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक तथा खासगी दहीहंडी पाहायला मिळाल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
राज्यातील पहिला प्रो-दहीहंडी उत्सव भाईंदरमध्ये होणार
भाईंदर : राज्यातील पहिल्या ‘प्रो -दहीहंडी’ उत्सवाचे आयोजन भाईंदरमध्ये केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मीरा-भाईंदर शहरातील तीन दहीहंडी उत्सवांना त्यांनी भेटी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी भाईंदरमधील आमदार गीता जैन, मीरा रोड येथील शिंदे गटाचे पदाधिकारी विक्रम प्रताप सिंग यांच्या प्रताप फाऊंडेशन आणि नवघर येथे आमदार प्रताप सरनाईक अशा एकूण तीन दहीहंडी उत्सवांना त्यांनी भेट दिली. ‘आम्ही दीड महिन्यापूर्वीच राज्याची हंडी फोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन केले’ असल्याचा त्यांनी या वेळी उल्लेख केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी भाईंदर येथील प्रसिद्ध बावन जीनालय या जैन मंदिराला भेट दिली.
शहरात उत्साह
मीरा-भाईंदर शहरातील विविध अशा ४३ ठिकाणी सार्वजनिक तर गल्लोगल्ली दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात राजकीय पुढाऱ्यांनी अधिक पुढाकार घेतल्यामुळे जणू लाखोंच्या बक्षिसांची हंडी बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळाली. विविध गोविंदा पथकांनी उंच उंच असे मानवी मनोरे सादर केले. मराठी सिनेकलांवतांचीही हजेरी होती. थर लावणाऱ्या पथकांना रोख रक्कम दिल्यामुळे जल्लोषाचे वातावरण होते.
पिपाण्यांचा उपद्रव
वसई, विरारमध्ये गोविंदा पथकांकडून वाजविल्या जाणाऱ्या पिपाण्यांचा मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत होते. त्याचा त्रास नागरिकांना होत होता. ट्रकमधून फिरणारे, रस्त्यावरून जाणारे गोविंदा जोरजोराने पिपाण्या वाजवत होते. पिपाण्या विक्रेते ठिकठिकाणी दिसत होते.