वसई: दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वरसावे पुलाजवळील चौकीनंतर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहने वसई विरारच्या हद्दीतील महामार्गावर उभी राहत आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीचा फटका येथील नागरिकांना बसू लागला आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. याच महामार्गावर मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वर्सोवा पुला जवळील चौकीनंतर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरसावे पोलीस चौकी फाऊटन हॉटेल ते दहिसर टोलनाका तसेच ठाणे घोडबंदर मार्गे मिरा भाईंदर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्या भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केल्याने मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाहने ही आता वसई विरार हद्दीतील महामार्गावर उभी राहू लागली आहे. काही अवजड वाहने तर अक्षरशः मुख्य रस्त्यावर उभी राहत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहनांना ये जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.
वसई पालघर भागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज २० ते २५ हजार वाहनांचा प्रवास होत असतो त्यापैकी ७० टक्के वाहने ही अवजड मालवाहतूक करणारी आहेत. त्यामुळे वर्सोवा पुलाच्या आधीच ही वाहने उभी करून ठेवली असल्याने जात असल्याने मालजीपाडा,ससूनवघर, बापाणे, चिंचोटी या भागात उभी राहत असल्याने आता या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
सततच्या वाहतूक कोंडीमुळे महामार्गाच्या गाव पाड्यालगत असलेल्या नागरिकांना दैनंदिन दळणवळण करताना ही अडचणी येतात.यासाठी ज्या अवजड वाहनांना बंदी घातली ती वाहने उभी करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे व येथील निर्माण होणारी कोंडी सोडवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
“विरार ते वर्सोवा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक भार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी शिरसाट फाटा पूर्वीच प्रवेशबंदी करणे गरजेचे होते, मात्र तसे न झाल्याने महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, या प्रवेशबंद वाहनांसाठी ट्रक वे किंवा टर्मिनल सुविधा उभारण्याची गरज होती, पण ती अद्याप उपलब्ध झाली नाही. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे.”
सुशांत पाटील, अध्यक्ष भूमिपुत्र फाऊंडेशन वसई
ट्रक टर्मिनल नसल्याने अडचणी
वसई, पालघर, भिंवडी, ठाणे, अशा भागात औद्योगिक क्षेत्र ही विस्तारत आहे. त्यामुळे त्या वसाहतीमध्ये कंटेनर व ट्रक द्वारे मालाची ने आण करण्यासाठी सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. काही मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना माल गाडीत भरणे- उतरविणे, महामार्गावरून अवजड वाहने चालविण्याची वेळ मर्यादा, विश्रांती साठी मुक्काम करावा लागतो.परंतु वाहने उभी करण्यासाठी नियोजित अशी जागा उपलब्ध नसल्याने थेट ही वाहने महामार्गावरील मुख्य रस्तावर उभी केली जातात. याचा परिणाम हा महामार्गावरील वाहतुकीवर होत असतो. ट्रक टर्मिनलची सुविधा नसल्याने अशी अडचण निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे अवजड वाहने महामार्गावर जागा मिळेल त्या ठिकाणी उभी करून वाहतुकीला अडथळे ठरत आहेत.