वसई : भात झोडणीनंतर त्यातून बाहेर पडणारा पेंढा हा जनावरांना चारा म्हणून वापरला जात असल्याने  पेंढ्याच्या भाऱ्यांची मागणी वाढली आहे. हा पेंढा टेम्पो, ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक भरून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धोकादायक वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अशा वाहतुकीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वसई विरारच्या भागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते.दरवर्षी भात झोडणीच्या कामानंतर मोठ्या प्रमाणात पेंढा बाहेर निघतो. या पेंढ्याचा वापर गुरांना चारा म्हणून वापर होत असतो. त्यामुळे मुंबई यासह विविध ठिकाणच्या गोशाळा व तबेल्यातून मोठी मागणी असते. त्यामुळे वसईच्या भागात ही विविध ठिकाणाहून व्यापारी येऊन पेंढा खरेदी करून नेला जात आहे.ट्रक व टेम्पोत भरून वाहतूक सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र त्याची वाहतूक करताना कोणत्याही प्रकारचे नियम न पाळताच धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू झाली आहे.एकावर एक असे भारे रचून त्याची वाहतूक होत आहे.

विशेषतः वर्दळीच्या असलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सुद्धा पेंढ्याने भरलेल्या भाऱ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. काही वाहनचालक हे काही वेळा क्षमतेपेक्षा अधिक पेंढा भरून धोकादायक वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही वेळा पेंढा इतका भरलेला असतो की वाहनांचा तोल हा एका बाजूने झुकलेला असतो. अशा वेळी वाहन चालकांचे नियंत्रण सुटून पलटी होऊन अपघात  होऊ शकतो असे नागरिकांनी सांगितले आहे.यासाठी अशा प्रकारची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली होती.महामार्गावर पेंढ्याची क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक होते याबाबत परिवहन विभागाला पत्र देऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात सांगितले जाणार आहे.:- अरविंद चौधरी, वरीष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक महामार्ग चिंचोटी केंद्र

यापूर्वी लागली पेंढ्याच्या ट्रकला भीषण आग

२८ जानेवारी २०२२ रोजी वसईत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भामटपाडा पुलाजवळ पेंढा वाहून नेणाऱ्या वाहनाला भीषण आग लागली होती.ही आग पेंढा भाताणे येथे भरुन भालिवली मार्ग येत असताना विद्युत वाहक तारांचा स्पर्श झाल्याने लागली होती. सुरवातीला आग लागल्याची कोणतीच माहिती चालकाला नसल्याने चालकाने आग लागलेला ट्रक एक ते दोन किलोमीटर इतका महामार्गावर चालविला होता.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक ही धोकादायक ठरत असते. काही दिवसांपूर्वी शिरसाड येथे क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडला होता.क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होते. त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची आहे. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने सर्रास पणे धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.अपघाताच्या घटना घडण्यापूर्वीच धोकादायक पध्दतीने वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.