लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वसई-विरार शहरात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. रिक्षांत व व्हॅन मध्ये अगदी कोंबून विद्यार्थी भरून त्यांची वाहतूक सुरू असते. अशा धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी बस गाड्या, व्हॅन ही ठेवल्या जात आहेत. परंतु या मुलांची सुरक्षितरित्या वाहतूक होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शाळेला लावण्यात आलेली वाहने नियमांचे व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघातासारख्या घटना समोर येत असतात.
वसई विरार शहरात अजूनही विविध ठिकाणच्या भागात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकताच वसईच्या तहसीलदार कार्यालयाचा समोरच एक रिक्षाचालक चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करीत असताना दिसून आला आहे. रिक्षाच्या मागील बाजुस सुरक्षित जाळ्या असल्यातरी पुढील सीट वर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षित जाळ्या नाहीत. तर एकाच बाजूने दोन मुले अगदी कडेला बसून प्रवास करीत आहेत. अशा प्रकारामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः गतिरोधकावर, किंवा खड्ड्यात रिक्षा आदळली तर समोर बसलेली मुलं खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नगरिकांनी सांगितले आहे. वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून वाहनचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
परिवहन विभागाने नव्याने परवाने मंजूर केल्यानंतर मोठय़ा संख्येने रिक्षा वसईत दाखल झाल्या आहेत. मात्र काही मुजोर रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत अवैध प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले आहे. अतिरिक्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीमुळे जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पध्दतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. -प्रशांत लांगी, वरीष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ २
तीनशेहून अधिक वाहनांवर परिवहन विभागाची कारवाई
धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक याबाबत परिवहन विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी नंतर प्रादेशिक परिवहन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व अन्य वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.यात शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बसेस व इतर गाड्या यांचे वैध विमा प्रमाणपत्र, वैध वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक- मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा सर्व तपासणी केली होती. नऊ महिन्यात ५६५ बसेसची तपासणी केली यात २५७ वाहने दोषी आढळून आली तर अन्य १५६ वाहने तपासणी केली त्यात ६१ वाहने दोषी आढळून आली त्यांच्यावर कारवाई करून २६ लाख २८ हजार ७५० इतका दंड आकारला आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.