भाईंदर:- ओल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया करणारे २१  टोगो वाहन खरेदी करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे.याबाबतचे कार्यादेश नुकतेच कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. मिरा भाईंदर शहरातुन  दिवसाला जवळपास ५०० टन इतका कचरा निघतो.यात ओला व सुका असा मिश्र स्वरूपातील कचरा सर्वाधिक असतो.या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने उत्तन येथे घन कचरा प्रकल्प उभारला आहे.मात्र या प्रकल्प स्थळी दिवसाला केवळ ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होते. परिणाम उर्वरित शिल्लक राहिलाला कचरा प्रकल्प स्थळी पडून राहतो. यावर उपाय म्हणून शहरा अंतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे खणी १० बायोगॅस प्रकल्प  उभारले जात आहे.यातून कचऱ्याची समस्या काहींशा प्रमाणात कमी होणार असली तरी ती पूर्ण मार्गी लागणार नाही. त्यामुळे यात अजून भर देण्यासाठी ओल्या कचऱ्याची वाहतूक करणारे जवळपास २१ टोगो वाहन खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

हे वाहन कचऱ्याचे संकलम करून थेट त्यावर प्रक्रिया करण्याचे काम करणार आहे.हे वाहन खरेदी करण्यासाठी पालिकेला शासनाकडून निधी दिला जाणार आहे.यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ३ आणि बांधकाम विभागातर्फे १८  खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून  कंत्राट दाराला कार्यादेश देण्यात आले आहेत.येत्या सहा महिन्यात हे वाहन पालिका ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती  उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.

टोगो वाहनाची वैशिष्ट्ये :-

टोगो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो अशी ही संकल्पना आहे.चालता-फिरता कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे टोगो हे या प्रकारचे पहिलेच यंत्र वाहन आहे.हे वाहन नैसर्गिक इंधनावर चालत असल्याने आणि प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने  प्रदूषण विरहित आहे. शहराच्या विविध भागात जाऊन हे वाहन कचरा गोळा करणार असल्याने कचऱ्याच्या ने-आण दरम्यान सांडणाऱ्या कचऱ्यातून पसरणारी घाण व दुर्गंधी नियंत्रणात येणार आहेत.

खताचा वापर

या एका टोगो वाहनाची क्षमता दीड टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची आहे. यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे.हे खत शहरातील उद्याने , रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेली झाडे तसेच मोठ्या गृह संकुलातील उद्यानात टाकले जाणार आहे.