वसई: पालघर जिल्ह्यातील देहरजी धरण प्रकल्पाच्या अडीच हजार कोटींच्या वाढीव खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. वसईचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्टी दाखवत पालिकेमार्फत २०१४ मध्येच या प्रकल्पासाठी १५६ कोटी रुपये भरले होते. त्यामुळे आता या धरणाचे १९० दशलक्ष पाणी आता वसई विरारसाठी राखीव झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणार्या देहरजी प्रकल्पातील १९० दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरार शहराला मिळणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारीत २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या खर्चाला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे वसई विरारची भविष्यातील पाण्याची चिंता मिटली आहे. हा अतिरिक्त खर्च एमएमआरडीए करणार आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या सध्या २५ लाखांहून अधिक आहे. सध्याच्या लोकसंख्येला सुमारे ३७२ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. सध्या शहराला एकूण ३३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत आहे. एकीकडे पाण्याची तूट भेडसावत असताना दुसरीकडे शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वसई विरार शहरात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीचा फायदा
भविष्यातील वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे नियोजन करण्यासाठी वसईचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी २०१४ मध्ये देहरजी धरणाचा पर्याय सुचविला होता. त्यानुसार त्यांनी पालिकेमार्फत उत्तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे १६५ कोटी रुपये भरून धरणातील १९० दशलक्ष लिटर्स पाण्यावर दावा सांगितला होता. २०१९ मध्ये हा प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग झाला. मात्र २०१४ मध्ये पालिकेने आगाऊ १६५ कोटी भरले होते. दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांनी वनविभागाकडे पाठपुरावा करून प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर केले होते. त्यामुळे आता या धरणाचे १९० दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरारसाठी राखीव झाल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकार्यांनी दिली.
एमएमआरडीएनने आपल्या विकास आराखड्यात २०३६ पर्यंत शहराची लोकसंख्या ५५ लाख होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देहरजी धऱणाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता वसईकरांना पाणी मिळणार आहे. तेव्हाच ही दूरदृष्टी दाखवली नसती तर पाणी अन्य महापालिकांकडे गेले असते असे पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांनी सांगितले.