लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : मागील चार वर्षांपासून वसईत जखमी व आजारी पशु प्राण्यांवर उपचार करण्यासाठी नवीन पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय तयार करण्यात येत आहे. मात्र विद्युत व फर्निचर यासह अन्य कामे पूर्ण करण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वसई विरार शहरात एकही शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालय नसल्याने जखमी पशूंना उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे लागते. शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पशु प्राणी आहेत. काही वेळा पशु आजारी पडतात. तर काही वेळा रस्त्यावर वाहनांच्या धडका लागून व अन्य कारणामुळे जखमी होतात. अशा वेळी जवळच्या भागात रुग्णालय नसल्याने नागरिकांना पशूंना घेऊन नवी मुंबई यासह इतर ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. तेव्हा त्यांची चांगलीच फरफट होत असते.

आणखी वाचा-मिरा-भाईंदर महापालिकेत मोठे फेरबदल, २५३ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी

वसईत पशुवैद्यकीय शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी प्राणी प्रेमींनी सातत्याने केली आहे. त्यानुसार वसई पश्चिमेच्या सांडोर येथे पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रुग्णालय उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑक्टोबर २०२१ पासून सुरू केले आहे. उभारण्यात येत असलेले रुग्णालय हे ६ हजार ८०० चौरस फुटांचे असून यासाठी सुमारे ३.५० कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे. मात्र चार वर्षे होत आली तरीही काम पूर्ण होऊन रुग्णालय सुरू झाले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सद्यस्थितीत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत उभी झाली आहे. मात्र इमारतीच्या अंतर्गत विद्युत ,फर्निचर व अन्य कामे अगदी धीम्या गतीने सुरू असल्याने रूग्णालय सुरू होणार तरी कधी असा प्रश्न प्राणी प्रेमींनी उपस्थित केला आहे.जर तयार झालेला इमारतीचा वापरच होणार नाही तर त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाले आहे असे सांगितले जाते. मात्र किरकोळ कामातही वर्षभराचा अवधी घालविला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. आता अंतर्गत जे काही काम बाकी आहे ते जलदगतीने पूर्ण करून ते रुग्णालय सुरू करावे अशी मागणी प्राणी प्रेमींनी केली आहे.

आणखी वाचा-शहरबात : आसपास वावरणारे शैतान…

इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ फर्निचरचे काम बाकी आहे. पशुवैद्यकीय विभागाशी चर्चा करून कोणत्या प्रकारे फर्निचर तयार करून हवे त्यानुसार पुढील काम पूर्ण केले जाणार आहे. -संजय यादव, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

नियोजनाचा अभाव

जून २०२३ मध्ये रुग्णालयाचे ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र तेव्हा पासून विविध कारणे पुढे करीत ते काम अगदी कासवगतीने पुढे सरकत आहे. या कामात नियोजना अभाव असल्यानेच काम पूर्ण होत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

रुग्णालयात असे मिळतील उपचार

वसईत उभारण्यात येणारे पशुवैद्यकीय रुग्णालय हे सुसज्ज असे रुग्णालय आहे. एक्सरे , सोनोग्राफी, शस्त्रक्रिया, जखमीवर उपचार , लॅबची सुविधा व आधुनिक यंत्रणा आदी याठिकाणी बसवून पशु प्राण्यांवर उपचार केले जाणार आहे. याशिवाय पशु प्राण्यांच्या उपचारासाठी ज्या काही आवश्यक सोयीसुविधा त्यासुद्धा याठिकाणी मिळतील जेणेकरून उपचारासाठी पशु प्राण्यांना दूर घेऊन जाण्याची गरज पडणार नाही.