वसई : डिसेंबर महिन्यातील हिवाळ्यातील नाताळचा सण, नववर्षाचे स्वागत आणि सलग असलेल्या सुट्ट्यांमळे मेजवान्या, स्नेहमिलन, सोहळे आदींच्या आयोजनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी इव्हेंट मॅनेजर, ऑर्गनायजर एजन्सी, केटरर्स आदींची नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र त्यातही खासगी बल्लावाचार्याची अर्थात प्रायव्हेट शेफची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासगी मेजवान्यांमध्ये खासगी बल्लवाचार्य(शेफ)आणण्याचा कल गेल्या काही वर्षात वाढू लागला आहे.
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबजाम’ चित्रपटात खासगी खानसामा म्हणजेच ‘प्रायव्हेट होम शेफ’ किंवा ‘प्रोफेशनल शेफ’ ही संकल्पना दाखवण्यात आली होती. प्रायव्हेट शेफ ही संकल्पना परदेशात पूर्वीपासून कार्यरत आहेत. भारतातही ती गेल्या काही वर्षांपासून रूजू झाली होती. गुलाबी थंडीतील नाताळ सण, नववर्षाचे स्वागत आणि महिना अखेरीस लागून आलेल्या सलग सुट्ट्या या समीकरणात मेजवान्या (पार्टीज), गेट टुगेदर, गॅदरींग, स्नेहमिलन आदी रंगत आणत असतात. त्यामुळे फार्महाऊस, व्हिला, कार्यालय किंवा घरी पार्टीसाठी किंवा स्नेहमिलनासाठी अशा प्रायव्हेट शेफची मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षात याचे व्यावसायिक रूप वाढते आहे. करोना काळात आणि नंतर सुरक्षेच्या दृष्टीने खासगी प्रायव्हेट शेफची गरज आणि मागणी या दोन्हीमध्ये भर पडली. सध्या प्रायव्हेट शेफ पुरवणाऱ्या एजन्सी, कंपन्याही बाजारात कार्यरत आहेत.
काय आहे प्रायव्हेट शेफ संकल्पना?
प्रायव्हेट शेफ हे प्रोफेशनल किंवा काही वेळेस होम शेफ असतात. मोठ्या पार्टीजसाठी शेफसोबत बटलरची टीम असते. यात जेवणाचा मेन्यू ठरवणे, त्यासाठी लागणारे सामग्री, शिजवण्यासाठी लागणारी साधने, जेवण वाढण्यासाठी (सर्व्ह) करण्यासाठी लागणारी कटलेरी आदी सुविधा शेफ किंवा होस्ट करून देतात. प्रोफेशनल शेफ हे विविध क्युझिनमध्ये पारंगत असल्यामुळे जपानी, कोरिअन, इटालियन, चायनीज, इंडियन, महाराष्ट्रीय आदी सर्वच प्रकारचे व्यंजन बनवतात. यासह विविध सरबते ज्यूसेस, मॉकटेल, कॉकटेल आदी विविध प्रकारची शीतपेयेही बनवून देतात, याशिवाय लाईव्ह चाट, बार्बेक्यू या काऊंटरसह मेक युअर ओन पिझ्झा, आईसक्रीमवर आवडते टॉपिंग्ज सजवणे अशा काही मजेशीर आणि आकर्षक काऊंटर्सची सुविधा हे खासगी शेफ देतात.
हेही वाचा…महाबळेश्वर अवैद्य बांधकामावर हातोडा
प्रायव्हेट शेफची मागणी वाढली
कोणत्याही पार्टीमध्ये चमचमीत खाद्यपदार्थ हे मुख्य आकर्षण असतात. त्यामुळे त्याची व्यवस्था चोख असणे, स्वच्छता असणे आणि योग्य प्रकारे बनवलेले असणे आवश्यक आहे. अशावेळी अन्यत्र कंत्राट देण्यापेक्षा थेट खासगी शेफची नियुक्ती करणे सोयीचे ठरत असल्याने सध्या कल वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रायव्हेट शेफच्या मागणीत वर्षागणिक तब्बल १० ते १२ टक्क्यांनी वाढ होत आहे, ही माहिती इव्हेंट ऑर्गनायझर स्वप्निल महाजनी यांनी दिली.