प्रसेनजीत इंगळे
विरार : शहरातील आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील ७ महिन्यांत २३२ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत. सरासरी दर महिन्याला ३३ ते ३५ नागरिक आपले जीवन संपवत आहेत. शनिवारी जागतिक आत्महत्या दिवस असून या वाढत्या आत्महत्या मोठय़ा चिंतेचा विषय ठरत आहे.
शहरात दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार चालू वर्षांत जानेवारी ते जुलै महिन्याच्या २१२ दिवसांत ९०५ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यानुसार दर महिन्याला १२९ अकस्मात मृत्यू नोंदविले जात आहेत. यात ९० टक्क्यांहून अधिक आत्महत्येचे प्रमाण आहे. अनेक वेळा क्षुल्लक कारणावरून नागरिकांनी आपले जीवन संपवले आहे. यात महिलांच्या तुलनेने पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. मागील ७ महिन्यांत १६२ पुरुषांनी आत्महत्या केल्या, तर ७० महिलांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. करोनाकाळानंतर आत्महत्येच्या घटना अधिक वाढल्या आहेत. यात बहुतांश नागरिकांनी नैराशेतून आपले जीवन संपवले आहे.
मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहता सन २०२१ मध्ये ४३० नागरिकांनी आत्महत्या केल्या होत्या यात ३१५ पुरुषांनी, तर ११८ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २०२० मध्ये ३६३ यात २७१ पुरुष, तर ९२ महिला, सन २०१९ मध्ये ३३७ यात २३८ पुरुष, तर ९९ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. हे तीनही वर्षे करोनाचे असल्याने या काळात आत्महत्येचा आकडा अधिक आहे. त्यातही पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याने पुरुषांमध्ये ताणतणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामागे वाढती बेरोजगारी हे प्रमुख कारण मानले जात आहे.
पोलिस ठाणे परिसरातील आत्महत्या
पोलीस ठाणे पुरुष महिला
मीरारोड १६ ७
भाईंदर १३ ४
नवघर १५ ४
वसई १७ ८
नालासोपारा १३ १४
तुळींज ५२ २१
विरार ३६ १२
एकूण १६२ ७०
करोनाकाळात अर्थचक्र बिघडले
मानसशास्त्रज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, करोनाच्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या. टाळेबंदीमुळे नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले, अर्थचक्र बिघडले. यात बेरोजगारी, नैराश्य, मानसिक आजार, कौटुंबिक कलह, गुन्हेगारी आदींप्रमाणे एक चिंताजनक प्रकार म्हणजे आत्महत्यांचे वाढते प्रमाण होय. त्याचबरोबर नैराश्य, बेरोजगारी, कुटुंब कलह आणि मानसिक ताणतणाव प्रमुख कारण आहे. आत्महत्यांचे विच्छेदन केल्यास कारणे समोर येतील आणि इतरांना फायदा होईल असे
डॉ. सुरेश पाटील सांगितले.