प्रसेनजीत इंगळे

गती वाढवूनही इतर महानगरपालिकेच्या तुलनेने लसीकरण कमी

विरार : वसई-विरार शहरात  करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढून सर्वाधिक मृत्यू या काळात झाले आहेत. यामुळे पालिकेने लसीकरण मोहीम जलद गतीने वाढविण्याकडे कल दिला. पण यंत्रणा उभ्या करूनही शहरात एकूण लोकसंखेच्या केवळ ७.५ टक्के लसीकरण झाले आहे. हे इतर महानगर पालिकेच्या तुलनेने कमी आहे. शेजारीच  मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात एकूण लोकसंखेच्या २३.९० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.

वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरवात झाली आहे. यात आरोग्य सेवक, पहिल्या फळीतील नागरिक, जेष्ठ नागरिक, सहव्याधी रुग्ण, आणि वयोगट १४ ते ४४ आणि वयोगट ४५ ते ५९ अशा पद्धतीने लसीकरण सुरू आहे. यात सर्व वर्ग धरून पहिली मात्रा घेतलेले एक लाख १४ हजार ४३४ म्हणजेच केवळ ५.९ टक्के तर दुसरी मात्रा घेतलेले ३३ हजार ३३ हजार ५६१ म्हणजेच १.७ टक्के नागरिक आहेत.

तर १८ ते ४४ वयोगटातील अंदाजे लोकसंख्या ९ लाख ३५ हजार असून यातील ६८०९ नागरिकांना पहिला डोस दिला आहे. म्हणजेच केवळ ०.७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. हा कार्यक्रम शासनाने रद्द केला असल्याने इतर नागरिकांना याचा फायदा मिळू शकला नाही. तसेच ११ हजार ७६ पहिल्या फळीतील सेवकांनी  पहिली मात्रा १० हजार २७६ म्हणजेच ९२.८ टक्के तर दुसरी मात्रा ४ हजार १२४ म्हणजे ३७. ३ टक्के पहिल्या फळीतील सेवकांनी घेतली आहे.  तर एकूण ११ हजार ३०९ आरोग्य सेवकांपैकी पहिली मात्रा १० हजार ९९५ तर दुसरी मात्रा केवळ ८ हजार ७३७ म्हणजे ७७.३ टक्के आरोग्य सेवकांनी घेतली आहे.

तर अंदाजे दोन लाख ६० वर्षांवरील  जेष्ठ नागरिकांपैकी केवळ २३.६ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा  घेतली तर ७.३ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. तर ४५ ते ५९ वयोगटातील ६ लाख सहव्याधी आणि सामान्य लाभार्यांपैकी केवळ ७ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

एकूणच २० लाखाच्या अंदाजे लोकसंखेच्या नुसार केवळ ७.५ टक्के शहरवाशियांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पालिका एकीकडे लसीकरण केंद्र वाढवत असताना लशींचा पुरवठा कमी असल्याने तसेच शासनाचे सततचे लसीकरणाच्या बाबतीत बदलते नियम आणि नागरिकांची उपलब्धता यामुळे लसीकरण कमी आहे. पण लवकरच अधिकाधिक लसीकरण केले जाईल. अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिले आहे.

तर या उलट मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहीम जलदगतीने होत आहे. एकूण लोकसंखेच्या  २३.९० टक्के लसीकरण झाल्याची माहिती पालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.  एकूण लसीकरण दोन लाख ३९ हजार ६५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात सर्व वर्ग मिळून पहिली मात्रा एक  लाख ८० हजार म्हणजेच २३.६ टक्के नागरिकांनी घेतली आहे. तर दुसरी मात्रा ५८ हजार २४९ म्हणजेच ३२ टक्के नागरिकांनी घेतली आहे.

Story img Loader