विकासकामामुळे नैसर्गिक पाणी जाण्याच्या मार्ग बंद; नायगाव पूर्वेतील परिसरात पूरस्थितीची शक्यता

वसई : नायगाव पूर्वेतील भागात मागील वर्षभरापासून वसई-पनवेल व्हाया दिवा रेल्वे कॉरिडोरचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी टिवरी रेल्वे फाटक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रेल्वे समांतर माती भराव करून रस्ता तयार केला आहे. हा रस्ता तयार करताना पाणी निचरा होण्याचे मार्गात भराव टाकून नाले टाकण्यात आले आहे. यामुळे येथून पाणी ये-जा करण्याचा नैसर्गिक मार्ग अरुंद झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागील ३ वर्षांपासून नायगाव पूर्वेतील भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामध्ये कॉरिडोरचे कामही सुरू झाले आहे. या कामांतर्गत टिवरी रेल्वे फाटक ते जूचंद्र ते थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत रेल्वे समांतर माती भराव, उन्नत मार्ग, इतर आवश्यक बांधकामे, काँक्रीटीकरण, पायलिंग व इतर कामे सुरू आहेत. यामध्ये रेल्वे समांतर पाणी निचरा होणाऱ्या टिवरी वाण्याची खाडी, सनटेक नाला, टिवरी लोखंडी रेल्वे पूल, जूचंद्र एराची खाडी, लोखंडी पूल, चंद्रपाडा बंदरबाव आरसीसी उघाडी, तबेला खाडी मोठय़ा खाडीमार्गात माती भराव टाकून व काही ठिकाणी तात्पुरते आरसीसी नाले टाकून वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. रस्ते तयार झाल्याने येथील खाडय़ांचा प्रमुख मार्ग हा अरुंद झाला आहे. भरतीच्या वेळीही या खाडय़ामधून  मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असते. तर पावसाळ्यात ही सर्व आजूबाजूच्या भागांतील पाण्याचा निचरा याच खाडय़ांतून होत असतो. परंतु आता त्यात अडथळे निर्माण झाल्याने पाणी कोणत्या बाजूने जाणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेल्वे कॉरिडोरच्या कामामुळे नायगाव पूर्वेतील पाणी निचऱ्याचे मुख्य मार्गांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा नीट न झाल्यास रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस पाणी तुंबून नायगाव परिसर बुडण्याची शक्यता आहे. याबाबत पालिका व रेल्वे प्रशासन यांच्यासोबत पत्रव्यवहार करून सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र अजूनही यावर कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सांगितले आहे.

महामार्ग ही पाण्याखाली जाण्याची भीती

आयआरबीमार्फत राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा येथे उड्डाणपूल व घोडबंदर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आयआरबीमार्फत सदर महामार्ग समांतरसुद्धा पाणी निचऱ्याची कोणतीही उपाययोजना नाही. तसेच सदर ठिकाणी असलेले पाणी निचऱ्याचे जुने मार्ग मात्र या कामांखाली दबले गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महामार्गालगतसुद्धा पाणी साचून राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader