दाखले मिळविण्यासाठी फरफट
कल्पेश भोईर
वसई : वसई-विरार शहरातील अपंग नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही प्रमाणपत्र व इतर तपासणी दाखले मिळविण्यासाठी या नागरिकांची फरफट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विरार येथील ग्रामीण रुग्णालयात अस्थिव्यंग व मनोविकार प्रमाणपत्र सुविधा वगळता इतर सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने वसईतील नागरिकांना पालघर येथे जावे लागत आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुरुवातीला नोंदणी करणे, त्यानुसार तपासणी करणे या कामासाठीही नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. तर काही वेळा अपंग रुग्णांना मुंबईसारख्या ठिकाणी तपासणीसाठी जावे लागते. यात वेळ व पैसा दोन्ही गोष्टी वाया जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तर अनेक रुग्ण हे विविध प्रकारचे अपंग असतात त्यामुळे अशा रुग्णांना उचलून आणावे लागते. जर वसई परिसरातच अस्थिव्यंग, पक्षघात, मूकबधिर, नेत्र, कर्णबधिर, मनोविकार असे दाखले उपलब्ध झाले तर नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येऊ शकेल.
सध्याच्या स्थितीत विरारच्या ग्रामीण रुग्णालयात अस्थिव्यंग व मनोविकार यावर प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच मध्यंतरी ‘आय क्यू टेस्ट’ करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. परंतु तीसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अपंग बांधवांना जवळच्या भागात सोयीसुविधा मिळवण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, वसई-विरारमधील नागरिकांना जवळच्या भागातच अपंग नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. यासाठी शासनासोबत विविध स्तरांवर आमचा पाठपुरावा सुरू असतो, असे अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास केंगार यांनी सांगितले.
रोजगाराचा प्रश्न कायम
अपंगांना दुकाने टाकण्यासाठी परवाने दिले जात नाहीत तर दुसरीकडे जागाही उपलब्ध होत नाही.ज्यांना दुकाने मिळाली तेथे हप्तेवसुलीसारखे प्रकार घडत असल्याचे अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास केंगार यांनी सांगितले आहे. शासकीय विभागात नोकरीसाठी पाच टक्के जागा ही राखीव आहे. परंतु महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही, असे केंगार यांनी सांगितले आहे. सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळात जे काही अनुदान मिळते तेही तुटपुंज्या स्वरूपाचे असल्याने अडचणी येत आहेत.
‘पालिकेच्या रुग्णालयात दाखले उपलब्ध करून द्या’
पालिकेच्या अपंग कल्याण विभागातर्फे व्याधिग्रस्त नागरिकांना मासिक अनुदान देण्यात येते. त्याकरिता पालघर येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचाच दाखला देणे बंधनकारक केले आहे. म्पालिकेची वसईगाव व नालासोपारा (तुळिंज) येथे रुग्णालये आहेत. त्या अनुषंगाने जवळच्या ग्रामीण भागासाठी या रुग्णालयांतून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अपंगत्वाचे दाखले देण्याची सुविधा करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप राऊत यांनी आयुक्तांकडे केली आहे.