भाईंदर:- आगामी पावसाळ्यात मिरा भाईंदर शहराची परिस्थिती बिघडू नये, म्हणून महापालिका आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागांना आवश्यक कामांच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात येणार आहे.

मिरा भाईंदर हे खाडीकिनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास शहराला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उपाययोजना आखण्याकडे पालिकेचे प्रमुख लक्ष असते. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी गुरुवारी सर्व विभागीय प्रमुखांची विशेष बैठक बोलावली होती.या बैठकीत आयुक्तांनी निर्देश दिले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवर एकही खड्डा राहू नये, याची काटेकोरपणे काळजी घेतली जावी. तसेच नाल्यांची साफसफाई करत असतानाच त्यावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत. टेलिफोन कंपनी, वीज कंपनी आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या केबल्समुळे नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असल्यास, त्या केबल्स तातडीने स्थलांतरित करण्यात याव्यात, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

शहरातील ३० वर्षांहून अधिक जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींना संरचनात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना याआधीच जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. सांभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंते, प्रभाग समिती क्रमांक एक ते सहाचे सहायक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

मिरा भाईंदर शहरात सध्या विविध ठिकाणी सिमेंट रस्त्यांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामांमुळे नागरी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. शिवाय, पावसाळ्यात देखील हे काम सुरू राहिल्यास दुर्घटनांची शक्यता असल्याचे वाहतूक पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.