वसई : वसई, विरार शहरात मागील काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. या पावसाळय़ात झालेल्या वातावरण बदलामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. वसई, विरार शहरातील बहुतांश भाग हा दाटीवाटीचा आहे. अशा ठिकाणच्या भागात घाणीचे साम्राज्य अधिक आहे. अशा भागात विविध साथीचे आजार पसरत असतात.
पावसाळय़ात वातावरणातील बदलांमुळेसुद्धा विविध आजार होण्याचे प्रकार समोर येत असतात. नुकताच काही दिवसांपूर्वी वसई, विरार भागात मुसळधार पाऊस होऊन अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. सतत सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण बदलले आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला व इतर आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत. वसई, विरारमधील पालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, स्थानिक दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. याआधी काही तुरळक प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी येत होते आता आठ ते दहा दिवसांत या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरूच आहे. ताप, सर्दी, खोकला, यासह डेंग्यू, हिवताप अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात आहेत.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
पावसाळय़ात होणाऱ्या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी उघडय़ावरील व बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी साचून राहत असेल ते वाहते करावे, पाण्याचे पिंप, टायर, कुंडय़ा यात जास्त काळ पाणी साचू देऊ नका, ताप आल्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.