वसई विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस शिवसेनेत वाद; शिवसेना पदाधिकार्‍यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

वसई विधानसभेची जागेवर महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेला जागा मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Controversy in Congress Shiv Sena over Vasai Vidhan Sabha seat
प्रातिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता टीम

वसई: वसई विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवेसनेत (ठाकरे गट) वाद पेटला आहे. वसई विधानसभेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. जर ही जागा नाही मिळावी तर वसईतील सर्व शिवसैनिनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा ईशारा दिला आहे

वसई विधानसभेची जागेवर महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेला जागा मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. . शनिवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नवघर माणिकपूर शहर शाखेत बैठक पार पडली. १९८४ पासून शिवसेना वसई विधान सभा लढत आहे.

वसई मतदार संघात १९८४ ते २०१९ पर्यंत शिवसेना मशाल, धनुष्यबाण, आणि बॅट या निशाणीवर लढत आली आहे.  २००९ साली शिवसेनेतून विवेक पंडित आमदार म्हणून निवडून आले होते. २०१५ व २०१९ मध्ये शिवसेनेचा निसटता पराभव झाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहा मतदार संघापैकी वसई विधान सभा मध्ये शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले होते. आतापर्यंत काँग्रेस जेव्हा जेव्हा निवडणुकीत उभी राहिली त्यांचे डिपोजिट जप्त झाले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. वसई विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी वसईतील शिवसैनिकांचे एकमत झाले आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. जर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे अल्टिमेटम दिला आहे.

हेही वाचा >>> आईने घातलेल्या भावनिक सादेमुळे माघार; निवडणूक लढवणार नाही – राजीव पाटील

कॉंग्रेसही वसईसाठी ठाम

लोकसभेला वसईतून महाविकास आघाडीला चांगले मतदान झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या ही आशा पल्लवित झाल्या आहेत. या निवडणुकीत वसई विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी ही वाढत आहे. मात्र विजय पाटील हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातून विजय पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समोर त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर पाटील यांनी पुन्हा आपल्या मूळ कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेऊन पक्ष बांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला वसई विरार क्षेत्रातुन मिळालेले मताधिक्य लक्षात घेता.काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. मात्र दुसरीकडे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या सुरू झालेल्या चढाओढीमुळे महाविकास आघाडीतच वसई विधानसभेच्या जागेवरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute between congress and shiv sena thackeray over vasai vidhan sabha seat zws

First published on: 19-10-2024 at 22:27 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
Show comments