वसई- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ५ पोलीस अधिकार्‍यांना नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपासाचा (बेस्ट डिटेक्शन) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, विरार पोलिसांना नोव्हेंबर महिन्यात दोन प्रकरणात सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ५ पोलीस अधिकार्‍यांची निवड करण्यात आली. नायगावमधील लवेश माळी या तरुणाच्या हत्याप्रकरणाचा तपास केल्याबद्दल गुन्हे शाखा-२ चे शाहूराज रणावरे यांना सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार देण्यात आला. एका व्यापार्‍याच्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना गौरविण्यात आले. ५५ लाखांचे अमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले. गॅस सिलेंडर चोरी करून विकणार्‍या टोळीला अटक करून मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचे ६ गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेने उघडकीस आणले होते. याबाबत राहुलकुमार राख यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा – नालासोपार्‍यात बनावट जन्म दाखला तयार केल्याचे उघडकीस, तरुणीसह दोघांवर गुन्हे दाखल

विरार पोलिसांना दोन पुरस्कार

विरार पोलिसांना नोव्हेंबर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपासाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. विरार पोलिसांनी मोबाईल खेचून पळणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करून ९ गुन्हे उघडकीस आणले होते. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात अडवून हातचलाखीने लुटणार्‍या अजय-विजय या ठकसेनांच्या टोळीला अटक केली होती. या दोन गुन्ह्यांतील सर्वोत्कृष्ट तपासासाठी विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा – बेकायदेशीर जाहिरातबाजीला लगाम घालण्यासाठी वसई विरार महापालिकेची क्यूआर कोड प्रणाली कार्यान्वित

गुन्हे शाखा २ ला सर्वाधिक ३२ पुरस्कार

तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद यांनी ३ वर्षांपूर्वी दर महिन्याचे सर्वोत्कृष्ट तपासाचे पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली होती. २०२३ या वर्षात गुन्हे शाखा २ ने सर्वाधिक म्हणजे ११ सर्वोत्कृष्ट तपासाचे पुरस्कार मिळवले. पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा २ च्या पथकाने कामगिरीत सातत्य ठेवल्याने मागील तीन वर्षांत सर्वोत्कृष्ट तपासाचे ३२ तर एकूण १७० पुरस्कार मिळवले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of best investigation award for the month of november to police of vasai virar mira bhayandar commissionerate ssb