जिल्हा प्रशासनाचा वसई तालुक्याला अतिवृष्टीचा इशारा

विरार : केरळमध्ये मौसमी पाऊस दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वसईत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. दोन-अडीच तासांच्या पावसाने वसई-विरारमधील सखल भाग पाण्याखाली गेल्याने नागरिकांची   तारांबळ उडाली. पालिकेने या वर्षी पाणी तुंबणार नाही असा दावा केला होता पण पहिल्याच काही वेळच्या पावसाने पालिकेचे पितळ उघडे पाडले.  त्यात जिल्हा प्रशासनाने ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासून वसई-विरारमध्ये पावसाला सुरुवात झाली. टाळेबंदी शिथिल झाल्याने नाकारिकांची रेलचेल सुरू होती. अनेक ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यात चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठी  धावपळ सुरु होती. त्यात अचानक सुरू झालेल्या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. पावसाने दीड ते दोन तास चांगलाच जोर धरला होता. पण त्यानंतर पावसाने उसंत घेतली. पण या दोन तासांच्या पावसात अनेक भागांत गुडघाभर पाणी साचून राहिले ते सायंकाळपर्यंत तसेच  होते. यात प्रामुख्याने नालासोपारा परिसरातील आचोळे रोड, प्रगती नगर, टाकी रोड, स्टेशन परिसर, विजय नगर, महेश पार्क, समेळ पाडा, तर विरार पश्चिामेकडील जुना विवा कॉलेज रोड पाण्याखाली गेला होता. यामुळे चाकरमान्यांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

वसई-विरार महानगरपालिकेने यावर्षी १०० टक्के नालेसफाईचा दावा केला होता, त्यात पालिकेने या वर्षी पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी नव्या उघड्या निर्माण केल्या. तसेच नाल्यांचे रुंदीकरण केले, आणि सखल भागातील रस्ते उंच केल्याचे सांगितले होते. पण काही वेळच्या पावसाने पालिकेच्या कारभाराचे सर्वच पितळ उघडे पाडले. त्यात येत्या दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पालिकेच्या तकलादू कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

Story img Loader