वसई : बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपी डॉक्टरने पुन्हा बलात्कार केल्याचा आरोप २१ वर्षीय पिडितेने केला आहे. याप्रकरणी १३ वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हाच दाखल केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी आरोपी डॉक्टरचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पीडित तरुणी सध्या २१ वर्षाची असून लहान भावासह नालासोपाऱ्यात रहाते. तिच्या वडिलांचे २००५ मध्ये तर आईचे २००९ निधन झाले होते.
जानेवारी २०१६ मध्ये ती डॉ योगेंद्र शुक्ला याच्याकडे दाताच्या उपचारासाठी गेली होती. तेव्हा डॉ शुक्ला याला पीडित अनाथ असल्याचे समजले. त्याने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि मैत्री वाढवली तसेच लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर २०१६ पासून २०२४ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करत होता. माझ्या अश्लील चित्रफितीच्या आधारे तो ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही पीडितेने केला.
१६ सप्टेंबर २०२४ रोजी डॉक्टरने लग्नाला नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने आचोळे पोलीस ठाण्यात डॉक्टर शुक्ला विरोधात तक्रार दाखल केली होती. आचोळे पोलिसांनी आरोपी डॉक्टर योगेंद्र शुक्ला याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) ६४(ड) ६९ तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायद्याच्या ( पोक्सो) कलम ४,८ १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉ शुक्ला याला पोलिसांनी अटक केली होती.
जामिनावर सुटल्यावर पुन्हा बलात्काराचा आरोप
ऑक्टोबर महिन्यात डॉ शुक्ला जामिनावर सुटला. त्यानंतर शुक्ला याने पुन्हा मारहाण करत बलात्कार केल्याचा आरोप पीडितने केला आहे. डॉ योगेंद्र शुक्ला, त्याची आई सत्यभामा शुक्ला आणि वहिनी रिटा शुक्ला, भाऊ निलेश शुक्ला यांनी बळजबरीने गर्भपात घडवून आणला असाही आरोप पीडितेने केला. डॉक्टर शुक्ला याने सतत मारहाण करायचा, सिगारेटचे चटके द्यायचा असाही आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात मागील ४ महिन्यात १३ वेळा तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला असाही आरोप तिने केला.
जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचा अर्ज
पीडित तरुणी अनेकदा तक्रार देण्यासाठी आली होती. मात्र पुन्हा बलात्कार झाल्याचे तिने सांगितले नव्हते. आरोपी डॉक्टरने तिला जामीन मिळाल्यानंतर मारहाण तसेच धमकावल्याने आम्ही न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दिला आहे, असे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले.