वसईतील तोतया सुनील वाडकर डॉ. मणी यांचा परवाना वापरायचा
सुहास बिऱ्हाडे
वसई: तोतया डॉक्टर सुनील वाडकर ज्यांचा नोंदणी क्रमांक वापरून वसईत १४ वर्षे डॉक्टर म्हणून वावरत होता त्या डॉ सतीश मणी यांचा शोध लागला आहे. सतीश मणी हे सध्या भारतीय लष्करात कर्नल पदावर कार्यरत असून वाडकर याला ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुनील वाडकर हा तोतया डॉक्टर मागील १४ वर्षांपासून वसई विरार शहरात डॉक्टर म्हणून वावरत होता. विरार येथे ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ अशी दोन रुग्णालये तो चालवत होता. तब्बल ७ वर्षे तो वसई विरार महापालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची पोलखोल ‘लोकसत्ता’ने केल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल झाले होते. सुनील वाडकर याने महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी केल्याचे तसेच ८६८३५ हा नोंदणी क्रमांक असल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र हा नोंदणी क्रमांक बंगळूरु येथील डॉ सतीश मणी यांच्या नावावर होता. त्यांनी २००७ पासून आपल्या परवान्याचे नूतनीकरणही केले नव्हते. त्यामुळे डॉ.सतीश मणी यांचे काय झाले? ते कुठे आहेत? वाडकर याने मणी यांचाच नंबर का घेतला? असे सवाल लोकसत्ताने उपस्थित केले होते. सतीश मणी समोर येत नसल्याचे त्यांच्याबाबत गूढ निर्माण झाले होते.
अखेर डॉ सतीश मणी यांचा शोध लागला आहे. डॉ.मणी भारतीय लष्करात रुजू झाले असून सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे लष्करात कर्नल म्हणून बढती मिळाली आहे. ते लष्करात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. मला लष्करात जायचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले आहे. आता मी लष्कारात कर्नल पदावर असून डॉक्टर म्हणून काम करतो. बाहेरील रुग्ण तपासत नाही आणि लष्करामार्फत मला पगार मिळतो. म्हणून मी माझ्या वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण केले नाही, असे डॉ.मणी यांनी सांगितले.
कोण वाडकर? मी ओळखत नाही
सुनील वाडकर हा तोतया डॉक्टर आपल्या नोंदणी क्रमांकांवर डॉक्टर म्हणून वावरत असल्याचे समजल्यावर धक्का बसला. कोण सुनील वाडकर? मी त्याला ओळखत नाही आणि त्याला कधी भेटलोही नाही असे त्यांनी सांगितले. सुनील वाडकर याने १४ वर्षांत अनेकांना खोटी मृत्यू प्रमाणपत्रे, खोटा वैद्यकीय विमा दिल्याचे तसेच इतर अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे डॉ.मणी हे देखील पोलिसांत तक्रार देणार आहेत.
डॉ सतीश मणी यांच्या वैद्यकीय नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करून तोतया सुनील वाडकर डॉक्टर म्हणून वावरत होता. डॉ मणी यांच्याशी संपर्क झाला असून ते सध्या भारतीय लष्करात कर्नल पदावर आहेत. वाडकर याला अटक केल्यानंतर त्याने हा क्रमांक कसा मिळवला ते स्पष्ट होईल.
– प्रफुल्ल वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे (प्रस्तावित)