सुहास बिऱ्हाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : करोनाकाळामध्ये थेट मासे घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वसईतही अनेकांनी थेट घरपोच मासे विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. चालू वर्षांत देशात थेट घरपोच मासे विक्रीच्या व्यवसायात १०.५ टक्कयांनी वाढ झाली आहे. बडय़ा ऑनलाइन अग्रीकेट कंपन्यांनाही ऑनलाइन मासे विक्री सुरू केली असून त्यांच्या मत्स्य विक्रीत तब्बल चालू वर्षांत १२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

करोनाकाळात टाळेबंदीमुळे प्रत्यक्ष मासे विक्री बंद झाल्याने मत्स्यप्रेमींच्या खव्वयेगिरीला ब्रेक लागला होता त्यामुळे या काळात थेट ग्राहकांच्या घरी मासे विक्रीच्या व्यावसायाने (डायरेक्ट टू कस्टमर) जोर धरला. करोना निर्बंध उठल्यावर प्रत्यक्ष विक्री सुरू झाली तरी थेट मासे विक्री (बीटूसी किंवा डीटूसी ) विक्री सुरूच आहे आणि हा व्यवसाय अधिक वाढत आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ई-कॉमर्स लॉजिस्टिक परिषदेत या व्यवसायात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली.

थेट मासेविक्रीसाठी वसईतील तरुणांनी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सुरुवात केली तर काहींनी अ‍ॅप तयार केले आहे. करोनाकाळात मासे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली होती. अशा वेळी दूरध्वनीवरून, व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्राहकांची माशांची मागणी घेऊन ती पोच करणे, अशा पद्धतीने मासेविक्री सुरू केली होती. टाळेबंदी उठल्यानंतर सामान्यपणे मासे बाजार भरू लागला, विक्री सामान्यपणे होऊ लागली. मात्र ऑनलाइन मागणीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. आम्ही उभारलेली यंत्रणा बंद न करता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे मासे विक्री करतो. मात्र ऑनलाइनवर संपूर्ण शहरभरातून मागणी येते. महिन्याला कमीत कमी ६० ते ८० हजारांची विक्री होते, अशी माहिती वसईतील मासे विक्रेते मिल्टन सौदिया यांनी सांगितले.

मत्स्यनिर्यातीमध्ये वाढ

भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक माशांचे उत्पादन करणारा आणि चौथा मोठा माशांची निर्यात करणारा देश आहे. भारतात २०१४ पासून दरवर्षी १० ते ११ टक्क्यांनी माशांच्या उत्पादनात वाढ होते आहे. मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२२ या वर्षांत भारतातून १६.२५ टन मासे निर्यात करण्यात आले. ज्याची किंमत ५७ हजार ५८६ कोटी रुपये एवढी होती, या उत्पादीत माशांच्या विक्रीसाठी करोनाकाळात विक्रेत्यांना नवा पर्याय मिळाला. फ्रेशटूहोम, लिशियस, कॅप्टन फ्रेश, फिश रिटेल इत्यादींसारख्या अनेक ऑनलाइन अग्रीगेटरमुळे देशाच्या २२० शहरांमध्ये ३.८ कोटींचे मासे विकले गेले. ऑनलाईन अ‍ॅप, संकेतस्थळं, समाजमाध्यमे यामुळे २०२२ वर्षांत १०.५ टक्क्यांनी थेट ग्राहकांना मासे पोहोचविण्याच्या व्यवसायात वाढ झाली, असे एक्स्पर्ट मार्केट रिसर्च यांच्या इंडियन फिश मार्केट आऊटलुक २०२२ या अहवालात म्हटले आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वाधिक मागणी

करोनानंतर ‘फिशोमीटर’ नावाने स्टार्टअप सुरू केले. त्यात दोन अ‍ॅप विकसित केले, एक क्लाऊड किचन बनवले. याद्वारे ताजे, फ्रोजन मासे, माशांपासून बनवलेले फ्रोझन रेडी टू कूक पदार्थ तयार करायला सुरुवात केली. हा माल आम्ही बडय़ा ऑनलाइन अ‍ॅग्रीगेटरना, स्वत:च्या अ‍ॅपवरून तसेच समाजमाध्यमावरील जाहिरातींच्या माध्यमातून मासे विकतो. आम्ही महिन्याला साधारण कमीत कमी तीन लाख रुपयांचा माल विकतो असे मुंबईतील प्राजक्ता तांडेल यांनी सांगितले. सध्या डीटूसी मासे विक्री या सेक्टरची मोठय़ा प्रमाणात चलती आहे. यामुळे यात नवनवीन स्टार्टअप येत आहेत. याद्वारे ग्राहकांना स्वच्छ, साफ केलेले ताजे मासे मिळत आहेत. ग्राहकांना आता ऑनलइन ऑर्डर करण्याची सवय अंगवळणी पडली आहे, ज्याचा फायदा ऑनलइन मासे विक्रीलाही होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Door to door fish sales 10 percent increase in demand full use of social media ysh