लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : यंदा गणेशोत्सवात पर्यावरण पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मिरा भाईंदरमधील सामाजिक संस्थांकडून आता घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आङे.
मिरा भाईंदर शहरात दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान २० हजाराहून अधिक गणेशमूर्तींची स्थापना होत असते. यातील ९० टक्के मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) च्या बनलेल्या असतात. या मूर्ती तलावात, खाडीत विसर्जन केल्या जातात. त्यामुळे जलस्त्रोत प्रदूषीत होऊन पर्यावरणाची मोठी हानी होत आहे असचे. राज्य सरकारने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली असली तरी महापालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. परिणामी पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेची अंमलबाजवाणी होत नाही.
मिरा भाईंदरचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत गेल्या सात वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रदर्शन आणि स्पर्धा भरवत आहेत. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाला भेट देणार्यांपैकी बहुतांश भक्त पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्याची शपथ देखील घेत आहेत.
मात्र ही मोहीम एवढ्यापुरतीच मर्यादित न ठेवता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेहलोत यांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक शहरातील प्रत्येक घरांना भेटी देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्व समजावून सांगत आहेत. या भेटीदरम्यान गणेशत्सव किती वर्षांपासून साजरा केला जात आहे ? तो किती दिवस असतो? गणेश मूर्ती पयावरणपूरक असते की पीओपीची? तीची उंची किती असते? आणि विशेष करुन गणेश मूर्तीचे विसर्जन तलावात अथवा गृहसंकुलाच्या आवारातच केले जाते का आदी माहिती हे स्वयंसेवक गोळा करत आहेत. ही माहिती संकलीत करण्याबरोबर त्यांना तलावात विसर्जन केल्याने होणारे दुष्परिणाम देखील सांगण्यात येत आहेत.
शहराची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न
देशात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत असलेले पहिले शहर म्हणून मिरा भाईंदरची ओळख व्हावी, असा प्रयत्न या उपक्रमामागे आहे. मागील दोन वर्षात यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांमध्ये जनजागृती होऊन पीओपी मूर्ती पूर्णपणे बंद होतील असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
महापालिकेचा देखील उपक्रम
मिरा भाईंदर शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून महापालिकेने कायमस्वरूपी ‘बाप्पा माझा-शाडूचा’ मोहीम हाती घेतली आहे. यात अधिकाधिक नागरिकांना जोडण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. याशिवाय शहरातील मूर्ती विक्रेते,पर्यावरण प्रेमी आणि सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत.