लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे कंटाळून नालासोपारा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्मत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.

मुंबईच्या सातरस्ता येथे राहणार्‍या संगिता कनोजिया (२२) या तरुणीचा मागील वर्षी जुलै २०२२ मध्ये नालासोपाऱ्यात राहणार्‍या नितीशकुमार कनोजिया याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नात भरपूर हुंडा देऊनही तिचा अधिक रक्कमेसाठी छळ सुरू होता. तिचा पती, सासरे, सासू आणि नणंद तिचा हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. तिला मारहाण देखील करण्यात येत होती. या छळाला कंटाळून तिने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.हुंड्यासाठी दररोज माझा छळा केला जात होता, अपमानित केले जात होते असे तिने हाताच्या तळव्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे.

आणखी वाचा-इस्त्रायलच्या घराघरातील नागरिक युध्दासाठी रवाना, देश शोकसागरात मात्र शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

या प्रकरणी मयत संगिताचे वडील मुन्नीलाल कनोजिया यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माझ्या मुलीला मारहाण केली जायची, तिला उपाशी ठेवले जात होते, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी मयत संगिताचा पती नितेशकुमार कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया, सासू आशा कनोजिया आणि नणंद माला कनोजिया यांच्याविरोधात कलम ३०४(ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.

Story img Loader