वसई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी वसई विरार शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात आरोग्य शिबीर, व्याख्याने,मेळावे, विविध स्पर्धा, मिरवणुका असे कार्यक्रम जल्लोषात पार पडले.वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयात व प्रभाग समिती स्तरावरील कार्यालयात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालिकेतील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

तसेच तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालये व इतर शासकीय कार्यालयात ही डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.वसई पूर्वेच्या कामण येथे अंध दुःख निवारक मंडळ व सिद्धार्थ फाऊंडेशन यांच्या तर्फे डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.वसई तहसीलदार कार्यालयाजवळील सिद्धार्थ नगर येथे पंचशील क्रांती मंडळ यांच्या तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यावर युवा पँथर संघटना यांच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली होती. एकाच रस्त्यावर दोन मिरवणुका एकत्रित आल्यामुळे गाण्याच्या आवाजाने परिसर दुमदुमून निघाले होते.

पंचशिल ध्वजारोहन व बुध्द वंदना, व्याख्यान, मिरवणूक सोहळा, सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.कार्यक्रम स्थळी व मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कलाकाराचे अनोखे अभिवादन

वसईतील कौशिक जाधव या चित्रकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुबक असे चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी सुद्धा या कलाकाराने एक रुपयाच्या नाण्यावर बाबासाहेबांचे चित्र रेखाटले होते.

मिरा भाईंदरमध्येही उत्साह

मिरा भाईंदर शहरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, रोजगार मेळावे, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महापालिकेने देखील भाईंदर पश्चिम येथील आंबेडकरांच्या पुतळ्याची सजावट केली होती.तर मिरा रोड येथील बुद्ध विहार व विपासना केंद्र मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तर बौद्ध पंचायत समिती आणि अनेक सामाजिक संस्थानी आंबेडकरांची  प्रतिकृती तयार करून भव्य मिरवणूक काढल्याची दिसून आले.