लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून एप्रिल पासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्या आधीच पूर्ण केली जाणार आहे. यासाठी यावर्षी पालिकेने २४ कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे.
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे. यातच उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे, माती भराव, विकासाच्या नावाखाली बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले यामुळे मागील काही वर्षांपासून वसई विरारकरांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. तासभर जरी पाऊस झाला तरीही सखल भागात पाणी जमते. या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम हाती घेतले जाणार आहे.
वसई विरार मधील अनेक ठिकाणी नाल्यात जलपर्णी, कचरा, गाळ, माती ढिगारे यामुळे नाले तुंबून गेले आहेत. याशिवाय नाले तुंबून गेल्याने पाणी जाण्यास ही अडचणी येत आहेत तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव याशिवाय दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात १ लाख ५० हजार ५९० मीटर लांबीचे २०१ नाले असून त्या नाल्याच्या स्वच्छता करण्याची सुरवात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच केली जाणार आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने नालेखोदाई व पूरप्रतिबंधक कामे यासाठी २४ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्या आधीच शहरातील सर्व नाल्यातील गाळ उपसा करून स्वच्छ केले करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होईल असे पालिकेने सांगितले आहे.
नालेसफाई करण्याचे काम एप्रिल पासून सुरू केले जाईल. पावसाळ्या पूर्वीच सर्व नाले स्वच्छ कसे होतील या दृष्टीने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. -नानासाहेब कामठे, उपायुक्त महापालिका ( घनकचरा व्यवस्थापन)
ड्रेन मास्टर यंत्रामुळे स्वच्छता सुलभ
नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी मागील वर्षी पासूनड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ड्रेन मास्टर यंत्र हे प्रत्यक्षात नाल्यात उतरून त्याद्वारे स्वच्छता केली जाते.यापूर्वी पोकलेन ने स्वच्छता करताना त्यातुन निघालेला गाळ हा नाल्याच्या बाजूला काढून ठेवावा लागत होता.परंतु त्या ड्रेन मास्टर यंत्रामध्येच जमा झालेला गाळ सामावून ठेवून नंतर त्याची विल्हेवाट लावण्यास मोठी मदत होत आहे नाले ही चारही बाजूने स्वच्छ होण्यास मदत होत आहे.
मागील वर्षी १ लाख ३० हजार घनमीटर गाळ
निरी आणि आयआयटी या संस्थेने सुचविलेल्या उपाययोजना सोबतच पालिकेकडून नाल्यांचे रुंदीकरण, व त्यात साठलेला गाळ काढण्यावर भर दिला जात असल्याने पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मागील वर्षी करण्यात आलेल्या नाले सफाईच्या कामा दरम्यान १ लाख ३० हजार घनमीटर इतका गाळ निघाला होता.
जलपर्णीची अडचण
वसई विरारच्या नाल्यात जलपर्णीच्या वेली मोठ्या प्रमाणात आहेत. नालेसफाईच्या कामादरम्यान त्या काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची वाढ ही झपाट्याने होत आहे.एकदा काढून टाकल्या नंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची वाढ होते. त्यामुळे त्याची एकप्रकारे अडचण निर्माण होत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.