वसई विरार महापालिकेतर्फे रस्त्यावरील गटारांना बसविण्यात येणारी झाकणे दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली आहेत. या झाकणांवर पालिकेचे नाव आहे. ही झाकणे दुकानात विक्रीला कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेने मात्र या झाकणांचा गैरवापर होत नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा >>> वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू
वसई विरार महापालिकेतर्फे शहरातील गटारांवर झाकणे बसविण्यात येतात. ही झाकणे पेव्हर ब्लॉकची असतात. त्यावर पालिकेच्या नावाची आद्याक्षरे कोरलेली असतात. पण वसई विरार शहारतील बांधकाम साहित्याची विक्री करणार्या दुकानांमध्ये अशी झाकणे सर्रास विक्रीला ठेवली असल्याचे आढळून येत आहेत. ही झाकणे ७०० रुपयाला एक या दराने विकली जातात. जर जास्त झाकणे हवी असतील तर आगाऊ नोंदणी करावी लागेल असे एव्हरशाईन येथील विक्रेत्याने सांगितले. परंतु खासगी विक्रेता पालिकेच्या नावाची झाकणे कशी विकू शकतो असा सवाल उपस्थित झाला आहे. या दुकानदारांकडे ही झाकणे कशी आली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> वसई : ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिष, व्यापार्याची दीड कोटींची फसवणूक
पालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या झाकणांची चोरी होत असते. त्यामुळे ही झाकणे चोरीची तर नाहीत ना अशी शंकाही उपस्थित झाली आहे. ही झाकणे चोरीची नाहीत किंवा त्याचा गैरवापर होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. वसई विरार महापालिका शहरातील गटारांवर झाकणे बसविण्याचा ठेका देत असते. मात्र झाकणे चोरीला जाऊ नये यासाठी त्यावर पालिकेची आद्याक्षरे टाकणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार नावं टाकून झाकणे ठेकेदारांना विकत असतात, असे पालिकेचे शहर अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले. ठेकेदारांना झाकणे सतत लागत असतात. त्यामुळे विक्रेते आधीच त्यावर नाव टाकून विक्रीसाठी ठेवतात असेही त्यांनी सांगितले.