वसई : वसईतील एका चोरीचा कसलाही दुवा नसताना केवळ एका रिक्षावरील ‘दयावान’ या अक्षरावरून गुन्हे शाखा ३ च्या पथकाने नाट्यमयरित्या छडा लावला. ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच वेषांतर करून दोन ठिकाणी सापळे लावले होते. याप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.२६ मार्च रोजी वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरातील सायलेंट पार्क परिसरातील अली अकबर थांडलावाला यांच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरटयांनी दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केला होता आणि घरातील ९ लाखांचा ऐवज लुटून नेला होता. भरवस्तीतील या चोरीमुळे खळबळ उडाली होती. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा कक्ष ३ कडे सोपवला होता.

‘दयावान’ रिक्षाचा शोध, ३०० सीसीटीव्ही कॅमेरे

या चोरीचा कसलाच दुवा नसल्याने पोलिसांपुढे आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. एका कॅमेर्‍यात दोन आरोपी एका रिक्षात बसून जाताना दिसले. परंतु त्या रिक्षाचा नंबर दिसत नव्हता. त्या रिक्षावर ‘दयावान’ असे लिहिलेले होते. याच ४ अक्षरावरून पोलिसांनी चोरांचा माग काढण्याचे ठरवले. पोलिसांनी मग नालासोपारा मध्ये दयावान नावाच्या रिक्षाचा शोध घेतला. शेकडो रिक्षा शोधल्या. त्यावरून मलंग नावाचा रिक्षावाल्याचा संपर्क मिळाला. दायावान अक्षर असलेली रिक्षा त्याची होती. पंरतु रिक्षावाला हाती लागला नाही. पोलिसांनी मग त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना एक संशयित क्रमांक सापडला. तो केवळ अंधेरी येथे एकदाच सुरू झाला होता. नंतर तो नंबर बंद झालेला आढळला. पुन्हा पोलिसांनी मग त्या आधारे रेल्वेचे सीसीटीव्ही तपासायला सुरवात केली.

वेषांतर करून लावला सापळा

त्यातील एका आरोपी मुंबई सेंट्रल स्थानकावरून जाताना दिसला. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने मुंबई सेट्रल स्थानकात वेषांतर करून एक सापळा लावला. त्यात कुणी हमाल, कुणी बुटपॉलीश करणारे, कुणी प्रवासी बनून बसले. ८ तासांच्या प्रतीक्षेनंतर मुशीर खान (४०) या आरोपी सापळ्यात अडकला. त्यानंतर दुसर्‍या आरोपीला पक़डण्यासाठी अंधेरीत फेरिवाले बनून सापळा लावला आणि इम्राम शेख (३४) याला अटक केली. हे दोनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात मुंबईतील पवई, डीएन नगर, भायखळा, सांताक्रूझ, शिवाजी नगर आदी विविध पोलीस ठाण्यात ८ पेक्षा अधिक गुन्ह्यंची नोंद आहे.

आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. ते मोबाईल देखील वापरत नव्हते. फक्त एकदा अंधेरीत त्याने मोबाईल सुरू केला होता. चोरीच्या दोन दिवस आधी जाऊन घटनास्थळाची रेकी केली होती अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली. याप्रकरणीताल रिक्षाचालक मलंग हा तिसरा आरोपी आहे. त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सागर सोनावणे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव तसेच सायबर गुन्हे शाखचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण आदींच्या पथकाने केली