ग्रामविकास विभागाचे ४४३ घरकुलांचे उद्दिष्ट
कल्पेश भोईर
वसई: मागील काही वर्षांपासून वसईच्या ग्रामीण भागात शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतंर्गत गरिबांना घरकुले देण्यात येत आहेत. या वर्षी ग्रामविकास विभागाकडून ४४३ इतक्या घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषत: यात ड प्रपत्रातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. वसई तालुक्याच्या ग्राम विकास विभागाकडून ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या भागात केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना व राज्य सरकारच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना आदी योजना सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी ही वसईच्या गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव मागवून शासनातर्फे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. २०२२ या वर्षांत ४४३ इतके घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेतून २३६, शबरी योजनेतून १५७, आदिम योजनेतून ३५, रमाई १५ यांचा समावेश असल्याची माहिती वसई पंचायत समितीतर्फे सांगण्यात आले आहे.
घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव येत असतात. परंतु उद्दिष्ट ठरवून देत असल्याने एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना लाभ देत येत नाही. शबरी योजनेतून वसई पंचायत समितीकडून जवळपास २४२ प्रस्ताव पाठविण्यात आले होते त्यापैकी केवळ १५७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. तर प्रधान मंत्री आवास योजनेतून आमच्याकडे ड प्रपत्रातील २ हजार ५१४ इतक्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यांची छाननी केली असता त्यात १ हजार २९० लाभार्थी अपात्र ठरले तर १ हजार ३२४ लाभार्थी हे पात्र ठरले आहेत. त्यापैकीच यावर्षी २३६ इतक्याच घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी भरत जगताप यांनी सांगितले आहे. शासनाच्या योजना गरीब जनतेपर्यंत पोहचाव्या व लाभार्थ्यांना याचा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ही गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
९६ टक्के कच्ची घरे पक्की
- २०१६ ते २०२० या कालावधीमधे ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी ९६ टक्के घरकुल बांधून पूर्ण झाली आहे. या प्रधानमंत्री योजनेतून ३८४
- घरकुल मंजूर झाली होती त्यापैकी ३७५ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर राज्य सरकारच्या शबरी योजनेतून ३३४ घरे मंजूर झाली आहेत त्यातील ३२२ घरे पूर्ण झाली आहेत. रमाई योजनेत १५ मंजूर घरांपैकी ११ पूर्ण झाली आहेत. तसेच आदिम योजनेतून ३२ घरे मंजूर झाली होती. २९ घरे बांधून झाली आहेत. मागील चार वर्षांत एकूण ७६५ मंजूर झालेल्या घरकुलांपैकी ७३७ घरकुल पूर्ण झाली आहेत म्हणजेच ९६ टक्के घरकुल पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्की घरे मिळाली आहे. काही घरकुल ही जागेचा प्रश्न याशिवाय इतर अडचणींमुळे अपूर्ण राहिली आहेत.
शासनाच्या घरकुल योजना आहेत, त्या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविल्या जात आहेत. जे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे प्रस्ताव वेळोवेळी तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जात आहेत. त्यामुळे अनेक गरजूंना याचा लाभ मिळू लागला आहे.
– भरत जगताप, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वसई