लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी अंमली पदार्थाची तस्करी होऊ लागली आहे. नुकताच नव वर्षाच्या पूर्व संध्येला अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करीत तस्करी होत असल्याचा प्रकार उघड केला आहे. यात पोलिसांनी मॅफेड्रॉन व कोकेन असा सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

नववर्षांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष पार्ट्या आयोजित केल्या जातात. मद्यपान यासह काही ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर ही होत असतो. त्यामुळे अंमली पदार्थांची छुप्या मार्गाने तस्करी होत असते असे प्रकार रोखण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची खरेदी व विक्री यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

आणखी वाचा-बेकायदेशीर मद्य वाहतुक, विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर; पालघर जिल्ह्यात चार भरारी पथकांची नियुक्ती

नुकताच नालासोपारा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात दोन नायजेरियन नागरिक अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी आल्याचा संशय येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅग तपासली असता ५५४.४ ग्रॅम वजनाचा १ कोटी १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी) व १२०.४ ग्रॅम वजनाचा ३६ लाख १२ हजार रुपये किंमतीचा कोकेन असा एकुण १ कोटी ४७ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदिप टक्के, महेश पागधरे सुनिल कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव यांनी केली आहे.

Story img Loader