वसई: तुळींज पोलिसांनी नालासोपारा येथून ८० लाखाचे एमडी हे अमलीपदार्थ जप्त केले आहे. या प्रकारे एका मॅग्नेंट नागरिकाला अटक करण्यात आली आहे

नालासोपारा पूर्वेच्या ओमनगर येथील साईधाम मंदिर समोर अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक नायजेरियन नागरिक येणार असल्याची बातमी तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा लावून संशयीत नायजेरीयन इसम नाम आयफियानी नवफॉर (३८) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४०२ ग्रॅम वजनाचे एम. डी. (मेफेड्रॉन) नावाचे अमली पदार्थ आढळून आले. या मेफेड्रॉन अमली पदार्थांची किंमत २० हजार रुपये प्रती ग्रॅम आहे. या कारवाईत एकूण ८० लाख ४० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ क २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार करत आहेत.

ही कामगिरी तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरक्षक बनकर, पोलिस निरीक्षक पेडणेकर, सपोनि सुनिल पवार, सुटनासे पोलीस हवालदार. केंद्रे, छपरीबन,मोरे, वरठा, राहुल कदम, पोटे, शिंदे, पालवे आदींच्या पथकाने केली आहे.

यापूर्वी झालेल्या प्रमुख कारवाया

नालासोपारा परिसरात मोठया प्रमाणावर अमली पदार्थाचा व्यवहार चालत असतो. यामध्ये नायजेरियन नागरिक सक्रिय असतात. मागील काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

५ सप्टेंबर २०२४

नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील एसपी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला टाकून एडिका जोसेफ (३०) या महिलेला अटक केली होती.
त्यावेळी या महिलेकडे सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ आढळून आले. ती भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहत होती.

२२ जुलै २०२४

मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने घोडबंदरच्या येथे सापळा लावून सऊद सिराज सैय्यद (३७) सबरिना नुझुंबी (३४) या दोघांना अटक केलो होती. त्यांच्याकडून २ कोटींचे मॅफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त केले होते.

२०२३

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने पालघर जिल्ह्यातील अमली पदार्थाचा कारखाना उघडकीस आणला असून तब्बल ३७ कोटींचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते.