भाईंदर:- भांडण सोडवायला गेलेल्या एका पोलिसावर दोन मद्यधुंद तरूणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. शुक्रवारी दुपारी भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोन्ही हल्लेखोर तरुणांना अटक केली आहे.
शुक्रवारी धुळवडीनिमित्ताने शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होात. भाईंदर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे शुक्रवारी दुपारी शहरात गस्त घालत होते. दुपारच्या भाईंदर पश्चिमच्या शिवसेना गल्लीत दोन तरुण भर रस्त्यात वाद घालत असल्याचे त्यांना दिसून आले. हा वाद थांबवण्यासाठी भानुसे यांनी मध्यस्थी केली. मात्र यातील एका तरुणाने भानुसे यांना जोरदार धक्का दिला तर दुसर्या तरूणाने खिशातील चाकू काढून भानुसेच्या पोटावर वार केला. या हल्ल्यानंतर दोन्ही तरूण पळून गेले होते.
नागरिकांनी भानुसे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दखल करून आरोपी कमलेश गुप्ता आणि दिलीप खडक यांना अटक केली आहे. दोन्ही आरोप मद्यधुंद अवस्थेत होते असे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितले.