लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- विरारच्या पंखा फास्ट या पब मध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी ३ महिलांना अटक केली आहे.
विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथे पंखा फास्ट नावाचा पब आहे. या पब मध्ये दोन गटात मारामारी झाली. ती माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळावर गेले. मात्र मद्यधुंद महिलांना पोलिसांच्या पथकालाच मारहाण केली. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अमंलदार उत्कर्षा वंजारी (२५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पब मधील काव्या प्रधान (२२) या तरुणीने उत्कर्षा यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला तसेच त्यांच्या हाताचा चावा घेतला. तर अश्वीनी पाटील (३१) या महिलेने पोलीस कर्मचारी उत्कर्षा यांचे केस ओढले. त्यांच्या मदतीसाठी पब मधील महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर गेल्या होत्या. मात्र तिला देखील धक्काबुक्की करत तिचा टि शर्ट फाडण्यात आला. काव्या प्रधान या तरूणीने पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यावर लोखंडी बादलीने मारले आणि मनगटाचा चावा घेतला. तिसरी तरुणी पूनम यांनी देखील पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.
आणखी वाचा-वसई : बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलीस कुमक मागवून या तिन्ही जणींना ताब्यात घेण्यात आले. काव्या प्रधान, अश्वीनी पाटील आणि पूनम या तिन्ही जणींना कायदेशीर कारवाईत अडथळा आणि दुखापत केली म्हणून कलम ३५३, ३२३, ३२५, ३३२, ५०४, ५०६ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या तिन्ही जणींना सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता १ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे., अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतीकांत भद्रशेट्ये यांनी दिली.