मुंबई- बडोदा महामार्गासाठी माती भराव करण्यात येत असून यामुळे वसई तालुक्याच्या पूर्व पट्टीतील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मंगळवारी चांदीप येथे ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद पाडले. या कामासाठी पंधरा फूट भरणी केल्याने पूर्व पट्टीतील १५ हून अधिक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई दिल्ली द्रुतगती महामार्ग प्रकल्पाअंतर्गत मुंबई-बडोदा महामार्गाचे काम सध्या वसई जोरात सुरू आहे. वसई तालुक्याच्या पूर्वेकडून हा महामार्ग जाणार आहे. या मार्गासाठी पंधरा मीटरचा माती भराव करण्यात येत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात माती भराव झाल्याने पूर्वेकडील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी एकत्र जमून काम बंद पाडले. महामार्गासाठी १५ फुटांचा माती भराव केला आहे मात्र पावसाळय़ात पाणी जाण्यासाठी केवळ दोन उघाडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. दोन दशकांपूर्वी चांदिप गावात आलेल्या पुराची पुनरावृत्ती होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आम्ही पुराची भीषणता अनुभवली आहे. आता या पंधारा फुटी भरावामुळे गावात पूर येऊन गाव शिल्लक राहणार नाही असे ग्रामस्थ सागर किणी यांनी सांगितले. काहीही झालं तरी यापुढे हे काम होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
‘उन्नत मार्ग तयार करा’
महामार्गाचे काम करण्यापूर्वी स्थानिकांना विचारात घेऊन सर्वेक्षण करणे गरजेचे होते. मात्र कुठलीही पाहणी न करता हा माती भराव करण्यात येत आहे. यामुळे पूर्व पट्टीतील १५ ते २० गावे आणि लहान पाडे पुराच्या पाण्याखाली जातील, असे बोईसर विधानभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. या ठिकाणावरून जाणारा महामार्गा हा उन्नत असायला हवा अशी आमची मागणी आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण गावांना बुडवून विकास करणार असाल तर आम्ही शेवटपर्यंत त्याला विरोध करू असे पाटील यांनी सांगितले.
महामार्ग कसा?
दिल्ली आणि मुंबई या दोन राजधानींना जोडणारा हा दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आहे. या महामार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. यातील पहिला टप्पा नुकताच खुला झाला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पुढच्या टप्प्यात मुंबई-बडोदा महामार्गाचे काम सुरू आहे. ८ पदरी असलेला हा महामार्ग ३७९ किलोमीटर लांब आहे. पालघर जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ७८ किलोमीटर एवढी आहे. पालघर जिल्ह्यात या महामार्गाचे एकूण तीन टप्प्यात काम केले जाणार असून महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यात जमिनीचे सपाटीकरण, माती भराव, भुयारी मार्ग, महामार्गावरील पुल आदी कामांचा समावेश आहे. या प्रकल्पातील पुढील टप्पे २०२४ पूर्ण होणार असून चौथा आणि शेवटचा टप्पा जून २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. हा शेवटचा टप्पा मुंबईतील आहे. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण करता येणार आहे. या महामार्गामुळे घोडबंदर रोड, ठाणे शहर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, शिळफाटा आणि नवी मुंबई ते पनवेलपर्यंतची अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच वसई-विरारमधील वाहतूक कोंडी दूर होण्यासही मदत होणार आहे.