वसई : पावसाळय़ात वाढत्या डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, हिवताप असे आजार बळावत असतात. आतापर्यंत शहरात डेंग्यू आजाराच्या १० रुग्णांची नोंद झाली असून हे प्रमाण रोखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी व वैद्यकीय विभाग यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पावसाळय़ात अनेक ठिकाणच्या भागात पाणी साचून राहते याशिवाय जुने टायर, नारळाच्या करवंटय़ा, प्लास्टिक ग्लास, झाडांच्या कुंडय़ा, भांडी, पिंप यात पाणी साचून राहून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू किंवा हिवताप असे आजार होण्याची शक्यता आहे. काही वेळा असे आजार नागरिकांच्या जिवावर बेतू शकतात. यासाठी पालिकेच्या स्वच्छता विभाग व आरोग्य विभाग यांचे संयुक्त पथक तयार करून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी सांगितले आहे.

स्वच्छतेवर अधिक भर

शहरात रोगराई पसरू नये यासाठी पालिकेने शहरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. नुकताच शहरात विविध भागांत सर्वेक्षण करून चाळीस ठिकाणे निवडली होती. विशेषत: यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा समावेश होता. त्या भागात सफाई कर्मचारी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचे अधिकारी नेमून स्वच्छता करवून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणी औषध फवारणी सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी सांगितले आहे.

Story img Loader