वसई : वसई पश्चिमेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी पाच च्या सुमारास ही घटना घडली. यात कोणीही प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
वसई पश्चिमेच्या हरिद्वार हॉटेल जवळच्या भागात बस चालकाने एम.एच.४७ वाय ६३२२ या क्रमांकाची बस प्रवासी वाहतुकीसाठी उभी केली होती. मात्र अचानकपणे बसच्या मागील बाजूच्या चाकाने पेट घेतला.
हेही वाचा…वसईत पावसाची संतधार सुरूच, नदीनाल्यांना पूर; पांढरतारा पाण्याखाली
तातडीने बस चालकाने याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच दिवाणमान उपकेंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळची वेळ असल्याने कामावर जाणारे प्रवासी बस ने प्रवास करीत असतात. मात्र या बस मध्ये कोणीच प्रवासी नसल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.