वसई : वसई विरार महापालिकाक्षेत्रातील शहरीभागात जरी पाणी टंचाई जाणवत नसली तरी वसई पूर्वेतील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, सातीवली, गिदराईपाडा या परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील नागरीक आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहेत.
वसई विरार भागात सूर्या प्रकल्प, पेल्हार, उसगाव धरणाच्या पाणीपुरवठा होत असला तरी वसई पूर्वेकडील बाजूच्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. वाढते नागरीकरण यामुळे पाण्याची समस्या अधिक जटील होऊन बसली आहे सध्या येथील नागरिकांना बोरवेल, विहिरी, तलाव, या ठिकाणच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.
आता मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा ही तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यातच आता पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामीण भागात पालिकेच्या जलवाहिन्या पोहचलेल्या नाहीत त्यामुळे तेथील नागरिकांना टँकर व बोअरवेल मारण्यात आल्या आहेत मात्र त्यातून देखील मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दरवर्षी अशीच परिस्थीती निर्माण होत असते मात्र याला प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वारंवार तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याने येथील नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. महापालिकेला ग्रामीण भागात राहत असलेली जनता ही कर भरते मात्र त्यांना मुबलक पाणी दिला जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.
२०१५ पासून पाण्याच्या समस्येच्या संदर्भात तक्रार करीत आहोत मात्र त्यातून योग्य तो तोडगा काढला जात नसल्याने ९ एप्रिल पासून प्रभाग समिती जी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
”जलकुंभ जीर्ण झाले, पण पाणी नाही आले”
वसई विरार भागातील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार होता यासाठी गावात जलकुंभ व जलवाहिन्या टाकल्या होत्या. मात्र पंधरा वर्षे झाली तर उभे केलेले जलकुंभ जीर्ण होऊन धोकादायक बनले परंतु त्यात काही पाणी आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे आहे.
टँकर द्वारे पाणी पुरवठा
वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. विविध ठिकाणी मिळून दिवसाला केवळ चार ते पाच टँकर इतका पाणी पुरवठा होतो तो ही अपुरा असल्याने पाण्याचा प्रश्न कसा सुटेल असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.
वसई फाटा गंगडी पाड्यात ही पाणी समस्या
वसई फाटा जवळील गंगडीपाडा येथील वस्तीत वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. परिसरात मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी मनपा देत होती, मात्र त्याची संख्या कमी केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत संजीवनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा खान यांनी सांगितले की, वसई फाटा परिसरात १० टँकरांची गरज आहे, पण मोजकेच देण्यात येत आहेत. तसेच गंगडी पाडा येथे ५ टँकरांची गरज असताना फक्त दोन टँकर दिले जात आहेत.