वसई – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेवर अंडी फेकण्यात आल्याने विरारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

विरारमध्ये सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चिखलडोंगरी येथून यात्रेला सुरवात झाली. संध्याकाळी एकता पार्कजवळून शोभायात्रा जात असताना अज्ञात व्यक्तीने अंडी फेकली. यामुळे एकच खळबळ उडाली. बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.