लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: नव्या घराची पाहणी करण्यासाठी कुटुंबीयांसोबत गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौशल मिश्रा ( वय -८)असे मृतक मुलाचे नाव आहे.

मिरा रोडच्या रामदेव पार्क येथे नव्याने निर्मित होत असलेल्या सावलिया अवेन्यू या इमारतीच्या सातव्या मजल्यावर घर विकत घेतल्यामुळे १ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास उमेश कुमार मिश्रा हे वडील श्रीनारायण मिश्रा आणि दोन मुले पियुष व कौशलसह पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा लहान मुलगा कौशल हा कुटुंबीयांना सोडून इमारती परिसरात टेहळणी करत होता.

दरम्यान तो नजरेआड झाल्याने उमेश कुमार हे त्याला शोधण्यासाठी बाहेर आले. यावेळी इमारतीच्या प्रांगणात असलेल्या उघड्या टाकीत कौशल बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. रमेश यांनी तात्काळ कौशलला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी पाहणी करून तो मृत झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विकासाकांच्या दुर्लक्षपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने रमेशकुमार यांच्या तक्रारी वरून विकासक रोशनलाल मालू आणि डुंगर मेहरा याच्या विरोधात मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader