अग्निशमन विभागाचे दुर्लक्ष

विरार : वसई-विरारमध्ये असलेल्या बहुतांश रुग्णालयात अपघाताच्या वेळी कामी येणारा पर्यायी मार्ग नसल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयात पर्यायी मार्ग नसल्याने अपघाताच्या तीव्रता वाढून अनेकांच्या बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यायी मार्ग नसताही अनेक रुग्णालयांना  महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने  अग्निसुरक्षा लेखा परवाने दिले आहेत. यात पालिकेची रुग्णालये सुद्धा सामील आहेत.  तर अनेक रुग्णालयांनी हे मार्ग केवळ नावापुरते बनविल्याचे आढळून आले आहेत.   

वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटनेतून कोणताही धडे घेतले नाहीत.  या दुर्घटनेत रुग्णालयाचा आपत्कालीन मार्ग बंद असल्याने अपघाताची तीव्रता वाढली होती. १६ जणांचा बळी या दुर्घटनेत गेला होता. यावेळी या दुर्घटनेतून बचावलेल्या नागरिकांनी या रुग्णालयाला पर्यायी मार्ग नसल्याचे आढळून आले होते. तसेच चौकशीत रुग्णालयाने हा मार्ग बंद करून याठिकाणी चिकित्सा दालन उघडले होते.

या दुर्घटनेनंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कारभारावर चौफेर ताशेरे ओढले गेले होते. त्यानंतर अग्निशमन विभागाने शहरातील ७०० हून अधिक रुग्णालयांना अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण करून घेण्याचा नोटीस बजावल्या आहेत. पण त्यात आपत्कालीन मार्ग (पर्यायी मार्ग) याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील अनेक रुग्णालये ही अनधिकृत बांधकामात दाटीवाटीच्या ठिकाणी आहेत. त्यांना कोणताही पर्यायी मार्ग नाही. तर काही  रुग्णालयांनी पर्यायी मार्ग केवळ नावापुरते तयार केले आहेत. तर अनेक रुग्णालयांनी हे इतर कामाकरिता वापरत आहेत. या यादीत वसई-विरार महानगर पालिकेची काही रुग्णालये सुद्धा येत आहेत. जिथे पर्यायी मार्गाची सोय नाही आहे. तुळींज येथील वसई-विरार महानगर पालिकेच्या रुग्णालयाचा पर्यायी मार्ग बंद असून त्याचा वाहनतळ म्हणून वापर केला जात आहे.  

रुग्णांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने रुग्णालयातील पर्यायी मार्ग असणे आवश्यक आहे. असे असतानाही पालिकेलाचया नियमाचा विसर पडला. पालिका रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल केले जातात. या रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर सुद्धा वाहने उभी असतात अशा वेळी हा आपत्कालीन मार्ग उपयोगी होऊ शकतो. परंतु मुख्य अग्निशमन अधिकारी आणि वास्तविकता यात मोठी तफावत दिसून येत आहे. शहरातील अनेक रुग्णालयांना कोणताही पर्यायी मार्ग नसताना परवाने दिले आहेत. यामुळे अग्निशमन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पर्यायी मार्ग नसतील तर कारवाई

वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी याबाबत  माहिती दिली की, आपत्कालीन मार्ग तथा पर्यायी मार्ग असल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला अग्नी सुरक्षा लेखापरीक्षणाचे दाखले दिले जात नाहीत. यासाठी अग्निशमन विभागाने पथक तयार केले असून दर महिन्याला रुग्णालयांची तपासणी केली जाईल ज्या रुग्णालयांचे पर्यायी मार्ग बंद असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.