वसई: मागील दोन महिन्यांपासून महसूल विभागाने कांदळवनात अतिक्रमण करणाऱ्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत तालुक्यातील सात विविध ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वसई, विरारमध्ये खाडीकिनाऱ्याला लागून मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे.
या कांदळवनांमुळे किनाऱ्यावरील पाण्याचा प्रवाह रोखणे, जमिनीची होणारी धूप थांबविणे, सुनामी, चक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण करणे, समुद्राचे प्रदूषण कमी करणे, समुद्रातील मत्स्य प्रजातींची जैविक साखळी अबाधित ठेवणे अशा विविध प्रकारे फायदेशीर ठरत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून कांदळवनांची कत्तल करून अतिक्रमण करून चाळी उभारणे, बेकायदेशीर पार्किंग व इतर बांधकामे करण्यात आली आहेत.
याविरोधात वसईच्या महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ज्या भागात कांदळवन कत्तल करून अतिक्रमण केले आहे अशा ठिकाणी पाहणी करून थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. यात जूचंद्र, ससूनवघर, बापाने, वैतरणा, शिरगाव आदी भागांत महसूल विभागाने कारवाई केली आहे. आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली आहे. इतर भागांतही कांदळवन क्षेत्रात पाहणी करून पुढील कारवाया करण्यात येणार आहेत, असेही कोष्टी यांनी स्पष्ट केले आहे. २०१६ ते २०१९ मध्ये केवळ नऊ गुन्हे कांदळवनांच्या अतिक्रमणाचे झाले होते. यंदाच्या चालू वर्षांतच सात गुन्हे महसूल विभागाने दाखल केले आहेत.
२४ एकर जागेची मोजणी
नुकताच नायगाव पूर्वेच्या जुचंद्र येथील म्हात्रे वाडी परिसरात भूमापन क्रमांक २४८ मध्ये भूमाफियांनी तब्बल २४ एकर जागेवरील कांदळवनाची कत्तल करून मातीभराव करून चाळी उभारल्या आहेत. याप्रकरणी महसूल विभागाने २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शासकीय सव्र्हे लावून या जागेची मोजणी करण्यात आली आहे व त्यानुसार किती प्रमाणात क्षेत्रातील कांदळवन नष्ट केले याचा अहवाल तयार केला आहे. याप्रकरणी महापालिका, खारभूमी विभाग यांना पत्रे सादर केली असून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वसईचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले आहे.
कांदळवनांची कत्तल करून अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरूच आहे. जशी प्रकरणे समोर येतील त्यानुसार चौकशी करून कारवाई केली जाईल. – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी, वसई