विरार : या वर्षी करोना वैश्विक महामारीचे निर्बंध हटल्याने घरोघरी गणपती उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.  दोन दिवसांपूर्वी शुकशुकाट असलेल्या बाजारपेठा शेवटच्या दिवशी गर्दीने फुलल्या आहेत. करोनाकाळात आर्थिक परिस्थिती खालावल्याने महागडय़ा सजावटीच्या वस्तूपेक्षा कृत्रिम वस्तूंची मागणी वाढत आहे. यात प्रामुख्याने फुले, हार आणि इतर फुलांपासून तयार होणारे सजावटीचे साहित्य आता कापडाच्या आणि कागदाच्या स्वरूपात ठिकठिकाणी बाजारात दिसत आहे.

मागील दोन वर्षांत करोना निर्बंधांमुळे सणाचा उत्साह नागरिकांना घेता आला नाही. त्यात टाळेबंदीच्या नियमांमुळे मोठा परिणाम रोजगारावर झाल्याने अनेकांची आर्थिक स्थिती ढासळली होती. पण या वर्षी आर्थिक चक्राला गती मिळाल्याने नागरिकांच्या हाती पैसा खेळू लागल्याने उत्सवाचा आनंद वाढला आहे. सर्वत्र गणेश उत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात असताना नागरिक खरेदीचा आनंद घेत आहेत.

हेही वाचा >>> वसई, विरारमध्ये फुलबाजार महागला ; फुलांच्या किंमतीत ४० टक्क्य़ांनी वाढ, तरीही मोगरा, चाफा, झेंडू, जास्वंद, शेवंती, गुलाबाला मोठी मागणी

नागरिकांचा उत्साह पाहता व्यापाऱ्यांनीसुद्धा बाजारात विविध नवनवीन वस्तू आणल्या आहेत. पण अवघ्या दोन दिवसांअगोदर बाजारात ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याने व्यापाऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या, पण शेवटच्या दिवशी ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्याने व्यापारीसुद्धा उत्साहित झाले आहेत.

बाजारात फुलांच्या विविध स्वरूपातल्या सजावटी दिसू लागल्या आहेत, विदेशी फुलांचे हार, गुच्छ, तोरण, गालिचे, अंबार, अरासी, फुलदाण्या, गणपतीच्या मूर्तीच्या मागच्या सजावटी, अशा अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू दुकानांत दिसत आहेत.

हेही वाचा >>> वैधता तारीख न छापता मिठाईची विक्री ; मिठाई विक्रेत्यांकडून शासनाच्या नियमाची पायमल्ली

प्लास्टिकवर बंदी असल्याने या वर्षी या वस्तू प्रामुख्याने कागद आणि कापडाच्या आहेत. यामुळे याच्या किमतीसुद्धा परवडणाऱ्या आहेत. या वस्तू खराब होत नसल्याने सातत्याने त्यांना बदलण्याची गरज भासत नाही. तसेच यांचे रंगसुद्धा कायम राहत असल्याने पुढील वर्षी व इतर कार्यक्रमांत याचा वापर सहज करता येत असल्याने नागरिक या कृत्रिम सजावटीची अधिक मागणी करत असल्याचे नालासोपारा येथील विक्रेते विक्रम पाटील यांनी सांगितले. या वस्तूची किंमत केवळ २०० रुपयांपासून सुरू होत ग्राहकांच्या मागणीनुसार वाढत जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कमी खर्चात आकर्षक सजावटीचा पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहक या सजावटीकडे ओढले जात आहेत.

Story img Loader