भाईंदर : मेट्रो कारशेडसाठी सुमारे दहा हजार झाडांवर कुर्‍हाड चालवण्याचा प्रशासनाचा निर्णय समोर आला असून, त्याविरोधात शहरातील पर्यावरणप्रेमींनी स्वाक्षरी मोहिमेचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत या मोहिमेत सहा हजाराहून अधिक नागरिक सहभागी होत स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शविला आहे.

मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ अंतर्गत, भाईंदरच्या डोंगरी भागात कारशेड उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी बांधकाम परवानगीदेखील देण्यात आली आहे. मात्र, या कारशेडसाठी एमएमआरडीएने ११,३०६ झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १,४०६ झाडे आधीच तोडण्यात आली असून उर्वरित ९,९०० झाडांच्या तोडासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने १२ मार्च रोजी जनतेसाठी सूचना प्रसिद्ध केली होती. यावर हजारो नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

या संदर्भातील सुनावणी प्रक्रिया नुकतीच ११ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतरही कारशेड उभारण्याच्या शासनाच्या भूमिकेत फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.या नुकताच मीरा भाईंदर शहरात प्रमुख रहदारीच्या ठिकाणी राबविण्यात आली होती. या मोहिमेत वृक्ष तोडीला विरोध दर्शविण्यासाठी सहा हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वाक्षरी केली आहे.

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. हळूहळू पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यातच वृक्ष तोड करण्याचे प्रकार सुरू आहेत याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.या मोहिमेतून जनजागृती करत, पुढे न्यायालयात दाद मागण्याचा संकल्प पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.