लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: वसईच्या किनार पट्टीची होणारी धूप व लाटांच्या तडाख्याने किनार पट्टीच्या भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी धुप्रतिबंधक बंधारे तयार केले जाणार होते. मात्र दोन वर्षे उलटूनही धूपबंधक बंधाऱ्यांची कामे मार्गी लागत नसल्याने मंजूर झालेले बंधारे केवळ कागदावर राहिले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वसई पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण समुद्र किनारे आहे. या किनार पट्टीच्या भागात ही मोठ्या संख्येने नागरिक राहत आहेत. धुप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात व भरतीच्या वेळी या किनारपट्टीच्या भागात मोठंमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसतो. त्यातच बेसुमार वाळू उपसा ,कचरा, किनाऱ्यालगत असलेली सुरुची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली आहेत.
तर दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्र किनाऱ्यावरील विविध भागात घुसून किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती , वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान होते. यासाठी या भागात धुप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात यावे अशी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत होती.यासाठी वसईच्या किनार पट्टीच्या भागात कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली होती.
यात विशेषतः भुईगाव, रानगाव, पाचूबंदर लांगेबंदर, नवापूर अशा समुद्र किनाऱ्याच्या समावेश आहे. यासाठी चारही बंधारे मिळून ३० कोटी इतका निधी ही मंजूर केला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मार्गी लागत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
वसईच्या भागाला यापूर्वी सुद्धा तौक्ते यासह इतर चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यात मोठे नुकसान झाले होते. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे संरक्षक भिंत म्हणून अतिशय महत्त्वाचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे.गावकरी व पर्यावरण प्रेमी यांनी मागील ३-४ वर्षापासून भुईगाव व समुद्र किनारी संरक्षक बंधारा बांधला जावा यासाठी तहसीलदार, प्रांत, महानगर पालिका, जिल्हाधिकारी, मेरीटाईम बोर्ड आदी ठिकाणी अनेकदा पाठपुरावा केला परंतु काहीही हालचाल झाली नसल्याचा आरोप डाबरे यांनी केला आहे. शासनाने मोठ्या वादळाची वाट न पाहता जे बंधारे मंजूर आहेत त्यांची कामे मार्गी लावावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शेती व सुरुच्या झाडांची वाताहत
हवामान बदलामुळे मागील २-३ वर्षापासून प्रचंड भरतीचे प्रमाण वाढले आहे. सोबत किनारपट्टी व पाणथळ भागात वाढत असलेली अतिक्रमण यामुळे समुद्राचे पाणी किनारा सोडून शेती व सुरुच्या बागेत घुसत आहे. भुईगाव समुद्र किनारी सुरुची हजारो झाडे भरतीच्या पाण्याचे शिकार झाली आहेत. भरतीचं पाणी शेतीत घुसल्याने शेतीवर याचा परिणाम जाणवू लागला आहे.
पर्यटन धोक्यात
वसई तालुक्यातील समुद्र किनारे पर्यटक, पक्षीप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. सागरी जिवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव, रानगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात. मात्र किनार पट्टीची वाताहत होत असल्याचे येथील पर्यटन धोक्यात सापडण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.