वसई- बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्तानंतर वसईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. माझं राजीव पाटील यांच्याशी या विषयावर बोलणं झालेलं नाही. पक्ष, कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाला स्वत:ची मते असतात असे ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा – शहरबात…. सुक्षिशित असलेले ‘अशिक्षित’
हेही वाचा – मीरा रोड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि वरिष्ठ नेते राजीव पाटील हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपातून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शनिवारी राजीव पाटील यांनी शहरात शुभेच्छा देणारे वैयक्तिक फलक लावले होते आणि त्यातून पक्षाचे नाव तसेच नेत्यांची छायाचित्रे वगळली होती. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने शनिवारी प्रसिद्ध केल्यानंतर वसई विरारच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राजीव पाटील यांच्या पक्षांतराच्या प्रश्नावर आमदार ठाकूर यांनी माध्यमांना सावध प्रतिक्रिया दिली. राजीव पाटील पक्ष सोडणार असल्याबाबतचे वृत्त मला माध्यमातून समजले. माझे त्यांच्याशी या विषयावर बोलणे झालेले नाही. मात्र प्रत्यकेाला स्वत:ची मते असतात असे ते म्हणाले. पक्ष, कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.