लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- नव्याने तयार झालेल्या नायगाव पोलीस ठाण्याला जागेची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेत तीन कंटेनर उभारून त्यात पोलीस अधिकार्यांसाठी अतिरिक्त कक्ष तयार केले जात आहे. असा प्रकारे कंटेनर मध्ये पोलीस ठाणे तयार करणारे नायगाव हे पहिले पोलीस ठाणे ठरणार आहे.
वसई विरार शहरात असलेल्या पोलीस ठाण्यांना पुर्वीपासूनच जागेची मोठी समस्या भेडसावत आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना २०२१ साली झाली. त्यापूर्वी शहरात वसई, माणिकपूर, वालीव, नालासोपारा, तुळींज, अर्नाळा सागरी आणि विरार अशी ७ पोलीस ठाणी होती.
नव्या रचनेनुसार वसईत मांडवी, आचोळे, पेल्हार आणि नायगाव या ४ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यातआली. नायगाव पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा नसल्याने ते खासगी इमारतीत भाडेतत्वावर सुरू केले होते. मार्च २०२३ मध्ये या पोलीस ठाण्याचे उद्घटन झाले. परंतु या नव्या पोलीस ठाण्यालाही जागा कमी पडत आहे. त्यामुळे काही पोलीस अधिकार्यांना बीट चौकीत बसविण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचा वाढता व्याप आणि दुसरीकडे जागेची कमतरता यामुळे कामात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.
आणखी वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; नागरिकांनी अडविल्या गाड्या
सध्या कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यासमोर खासगी विकासकाची जागा आहे. त्या विकासकाची परवानगी घेऊन या जागेवर कंटेनर उभे करण्यात आले आहे. या कंटेनर मध्ये पोलीस अधिकार्यांचे कक्ष सुरू केले जाणार आहे. एकूण ३ कंटेनर उभे करण्यात येत असून त्यामध्ये ३ पोलीस अधिकार्यांना बसवण्याची सोय होणार आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.
बोळींजला जागा नाही, माणिकपूरसाठी मजला वाढविणार
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ३ परिमंडळे आहेत. त्यापैकी मीरा भाईंदर शहरासाठी परिमंडळ १ असून वसई विरार शहरासाठी परिमंडळ २ आणि ३ तयार करण्यात आले आहे. सध्या परिमंडळ २ आणि ३ मध्ये एकूण ११ पोलीस ठाणी आहेत. विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून बोळींज पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. मात्र अद्याप जागा मिळत नसल्याने बोळींज पोलीस ठाणे रखडले आहे. माणिकपूर पोलीस ठाणे २६ वर्षांपासून खासगी इमारतीत भाडेतत्वार होते. ते नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र त्यांना देखील जागा अपुरी पडत आहे. यासाठी या नव्या इमारतीत एक मजला वाढविण्यात येणार आहे. तुळीजं पोलीस ठाणे नाल्यावर आहे. त्यांना देखील जागेचा शोध सुरू आहे. वालीव पोलीस ठाण्याला देखील नवीन जागा मिळालेली नाही.
आणखी वाचा-‘पोलिसांनी पैसे मागितल्यास मला फोन करा’, वरिष्ठ पोलीस अधिकार्याने लावले फलक
४ पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीच नाही
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात एकूण १७ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी ४ पोलीस ठाण्यांंना पोलीस कोठडीच नाही. परिमंडळ १ मधील नया नगर मध्ये तसचे वसई विरार परिमंडळातील नायगाव, पेल्हार आणि तुळींज पोलीस ठाण्यांना पोलीस कोठडीच नाही. मांडवी पोलीस ठाण्याची निर्मिती मागील वर्षी मालकी जागेत झाली. पंरतु तेथेही पोलीस कोठडी नव्हती. पंरतु आता तेथे नव्याने पोलीस कोठडी बनविण्यात आली आहे. या ४ पोलीस ठाण्यांना आरोपींना ठेवण्यासाठी अन्य पोलीस ठाण्यात जावे लागते. तुळींज, वालीव, विरार या पोलीस ठाण्यांमध्ये अतिशय कमी जागा असल्याने दाटीवाटीने काम करावे लागते. वाहने उभी करण्यास देखील जागा नाही. त्यामुळे पोलिसांप्रमाणे पोलीस ठाण्यात येणार्या अभ्यागतांची गैरसोय होत असते.